Advertisement

तलवाडयाजवळ तरुणाचा संशयास्पद मृत्यु

प्रजापत्र | Thursday, 06/04/2023
बातमी शेअर करा

तलवाड़ा - ऊसतोड मजुर असलेल्या तरुणाचा मृतदेह आज पहाटे तलवाडा ते गेवराई रोडवर एका धाब्याच्या पाठीमागे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान कुटूंब आणि नातेवाईकांनी खून झाल्याचा आरोप करत या प्रकरणातील मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. गेवराईतील उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात गर्दी करत नातेवाईकांनी शवविच्छेदन देखील रोखले. या प्रकरणात गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरु आहे. 

 

गेवराई तालुक्यातील तलवाडा पासुन जवळच असलेल्या पोईतांडा येथील राम ज्ञानेश्वर राठोड (वय-२१) हा काल रात्री ११ वाजन्याच्या सुमारास घराबाहेर पडला, तो परत आलाच नाही. आज पहाटे तलवाडा ते गेवराई रोडवर एका धाब्याच्या पाठीमागे तो मृत अवस्थेत आढळल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांना मिळाली. कुटूंब आणि नातेवाईकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवुन राम यास गेवराईच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. या प्रकारामुळे संतप्त नातेवाईकांनी आक्रमक भुमिका घेत रामचा खून झाल्याचा आरोप केला. शवविच्छेदन रोखले असुन खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाहीत अशी भुमिका त्यांनी घेतली आहे. दरम्यान घटनास्थळी पोनि.शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि बाळासाहेब भवर, बीट अंमलदार सचिन अलगट यांनी भेट दिली आहे.

Advertisement

Advertisement