Advertisement

चारचाकी गाडीचा ताबा सुटल्याने शिक्षकाचा जागीच मृत्यू

प्रजापत्र | Monday, 06/03/2023
बातमी शेअर करा

प्रवीण पोकळे 

चुलत सास-यांच्या अंत्यविधीसाठी निघालेल्या शिक्षकाचा अज्ञात वाहनाने हुलकावणी दिल्याने कारवरील ताबा सुटून कार २०० फूट दरीत कोसळल्याने गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली.तालुक्यातील बीडसांगवी गावाजवळील घाटात सोमवारी (दि.६) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.अंबादास पांडुरंग उगले (वय ४६ वर्षे) असे अपघातातील मृत शिक्षकाचे नाव आहे. याबाबत समजलेली माहिती,अशी की थिटेसांगवी (ता.श्रीगोंदा, जि.अहमदनगर) येथील अंबादास पांडुरंग उगले हे गेवराई तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत होते. सोमवारी पहाटे चुलत सासरे मयत झाल्याने त्यांच्या अंत्यविधीसाठी गेवराई येथून ते कडा (ता.आष्टी) येथे पत्नी सगुणा अंबादास उगले (वय ४० वर्षे) यांच्यासह फोर्ड कंपनीच्या कारने (क्रमांक एमएच-२३ एडी-०२४९) निघाले होते.बीडसांगवी घाटात आले असता त्यांच्या कारला अज्ञात वाहनाने हुलकावणी दिल्याने अंबादास उगले यांचा गाडीवरील ताबा सुटला व कार थेट २०० फूट दरीत गेली.या अपघातात गंभीर जखमी झाल्याने अंबादास उगले यांचा जागीत मृत्यू झाला.तर त्यांची पत्नी सगुणा अंबादास उगले या गंभीर जखमी झाल्या.त्यांच्यावर सुरवातीला कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारांसाठी अहमदनगर येथे हलविण्यात आले आहे. अपघाताची माहिती समजताच जिल्हा परिषद सदस्य माऊली जरांगे,बीडसांगवीचे सरपंच नंदकिशोर करांडे,संपत ढोबळे,विकास साळवे, दीपक कासवा,गणेश करांडे,बिभीषण शिंदे यांच्यासह चिखली व बीडसांगवी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहनातून मृतदेह बाहेर काढण्यासाठी तसेच जखमीला पुढील उपचारांसाठी हलविण्यासाठी मदत केली.

 

‘बांधकाम’च्या निष्काळजीपणाचा बळी

दरम्यान, कडा-केरूळ-बीडसांगवी ते गहिनीनाथगड या रस्त्याचे काम पाच वर्षांपूर्वी करण्यात आले आहे. या महामार्गाचे काम करत असताना सुमारे १० किलोमीटर अंतराच्या थराचे काम करण्यात न आल्याने नित्यमनियमाने अपघात घडत आहेत.तसेच काम करतेवेळी घाटाच्या सुरक्षिततेची कोणतीही काळजी घेण्यात आली नसून संरक्षक कठडेही बसविण्यात आले नाहीत.घाटाचा उतार मोठा असल्याने चालकांना या रस्त्यावर जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. त्यामुळे हा बळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणाचा असल्याची चर्चा परिसरातील गावांमधून होत आहे.

 

संपूर्ण घाटात संरक्षण कठाडे करा 

माऊली जरांगे या घाटात संरक्षण कठाडे नसल्यामुळे अनेक जणांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.अजून किती जणांचे बळी गेल्यावर बांधकाम विभाग लक्ष देणार संपूर्ण घाटात लवकरात लवकर संरक्षण भिंत करावे अशी मागणी जि.प.सदस्य माऊली जरांगे यांनी केली.

Advertisement

Advertisement