Advertisement

अर्थसंकल्पावर शेअर बाजारात नकारात्मक प्रतिक्रिया

प्रजापत्र | Wednesday, 01/02/2023
बातमी शेअर करा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण  यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका लक्षात घेता, या अर्थसंकल्पाकडून अनेकांना अपेक्षा होत्या. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर बाजारात असलेली तेजी नफावसुलीमुळे ओसरली. आज दिवसभरातील व्यवहार स्थिरावले तेव्हा सेन्सेक्स 158.18 अंकांच्या तेजीसह 59,708.08 अंकांवर स्थिरावला. तर, निफ्टी  45 अंकांच्या घसरणीसह 17,616.30 अंकांवर स्थिरावला. 

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या सेन्सेक्सने आज व्यवहाराची चांगली सुरुवात केली. बाजार उघडताच त्याने 60 हजारांचा टप्पा पार केला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने देखील 17,800 च्या अंकांवर तेजी व्यवहार सुरू केला. लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे अर्थसंकल्पीय भाषण सुरू असताना बाजारातही तेजी आली. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्सने दिवसभरातील 60,773.44 अंकांवर तर निफ्टी 17,972.20 अंकांवर उच्चांक गाठला. त्यानंतर अर्थसंकल्प उलगडू लागल्यावर  बाजारातील तेजीला लगाम लागला आणि घसरण सुरू झाली. 

वेगवेगळ्या सेक्टरनिहाय अर्थसंकल्पात असलेल्या तरतुदींनुसार बाजारात पडसाद दिसून आले. अर्थसंकल्पात पर्यटनावर भर दिल्याने हॉटेल्सचे समभाग वधारले. EIH, Indian Hotels, HLV Ltd, Club Mahindra, Lemon Tree या कंपन्यांच्या शेअर्सने 8 टक्क्यांपर्यंत उसळी घेतली. त्याचप्रमाणे रेल्वेशी संबंधित शेअर्समध्ये तेजी दिसून आली. 

अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी रेल्वेसाठी 2.4 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी भांडवली खर्चाची तरतूद केली. या घोषणेनंतर, RVNL, Titagarh Wagons, IRCON, KEC इंटरनॅशनल आणि Siemens सारख्या रेल्वे क्षेत्राशी संबंधित समभागांमध्ये 4 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. 

अर्थसंकल्पात पंतप्रधान आवास योजनेच्या निधीत भरीव तरतूद करण्यात आली. त्यानंतर सिमेंटच्या शेअर दरात तेजी दिसून आली. इंडिया सिमेंट्स, रॅमको सिमेंट्स, श्री सिमेंट्स आणि अल्ट्राटेक सिमेंट्सच्या शेअर दरात जवळपास 4 टक्क्यांची तेजी दिसून आली. त्याशिवाय, गृहनिर्माण क्षेत्राशी संबंधित स्टॉक्समध्ये तेजी दिसून आली.

बजाज फिनसर्व्हच्या शेअर दरात 5.5 टक्क्यांची घसरण दिसून आली. एसबीआयच्या शेअर दरात 5 टक्क्यांची घसरण झाली. इंडसइंड बँक, सन फार्मा, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, अॅक्सिस बँक, टायटन, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स आदी कंपन्यांच्या शेअर दरात एक ते चार टक्क्यांची घसरण दिसून आली. तर, आयटीसी, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील,  टीसीएस, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, कोटक महिंद्रा या कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. 

Advertisement

Advertisement