Advertisement

चिंचोली माळी येथे एकाच रात्री चार ठिकाणी चोरी, तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न

प्रजापत्र | Sunday, 25/12/2022
बातमी शेअर करा

केज दि.२५ -  तालुक्यातील चिंचोलीमाळी येथे अज्ञात चोरट्यांनी रविवारी पहाटे २ ते ३.३० वाजेच्या दरम्यान तिघांच्या घरांचे कुलुप तोडून कपाट आणि पेट्या तोडून दागिन्यांसह नगदी १४ हजार रुपयांची रक्कम लंपास करीत इतर तीन ठिकाणी घरफोडी करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

 

 

        केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील नागबेट परिसरातील फक्रुद्दीन हुसेन शेख हे ऊसतोडणीसाठी साखर कारखान्यावर स्थलांतरीत असून त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रविवारी पहाटे २ ते ३.३० वाजेच्या सुमारास घरात प्रवेश केला. घरातील कपाट तोडून कपाटात ठेवलेल्या दीड तोळ्यांचे दागिने काढून घेतले. त्यानंतर दत्ता काळे यांच्या घराचे गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. एका रुमचे कुलूप तोडून रूममधील दोन पेट्या उचलून नेल्या. शेतात जाऊन पेट्या फोडून कपडे व कागदपत्रे तेथेच ठेवून पेटीतील १० हजार रुपये काढून घेतले. बाळासाहेब गलांडे यांच्या घरात प्रवेश करीत त्यांच्या बहिणीचे दागिने घेऊन चोरटे विकास देशमुख यांच्या घरी गेले. त्यांच्या बाहेर अडकवलेल्या पेंटमधून ४ हजार रुपयांची रक्कम घेऊन चोरट्यांनी सलीम शेख, नागनाथ काळे व लिंबराज मगर या तिघांच्या घरांचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या आदेशावरून फौजदार वैभव सारंग, बिट जमादार राजू गुंजाळ, पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे, पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे, यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

 

 

श्वान पथक पाचारण 
या घटनेनंतर बीडच्या श्वान पथक गावात आले. चोरट्यांनी हाताळलेल्या वस्तूचा वास घेऊन श्वान तेथून काही अंतरावर फिरले. मात्र चोरट्यांचा कुठलाही माग पोलिसांना सापडलेला नाही. तर फिंगरप्रिंट एक्सपर्टने हाताळलेल्या वस्तूवरून चोरट्यांच्या बोटाचे ठसे मिळविण्याचा प्रयत्न केला. 
 

Advertisement

Advertisement