Advertisement

रानडुकराच्या हल्ल्याने बैल बिथरले

प्रजापत्र | Thursday, 22/12/2022
बातमी शेअर करा

दिंद्रुड - दोन नातवांना घेऊन आजोबा बैलगाडीतून शेतात जात असताना रानडूकरांनी बैलावर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने बिथरलेले बैल बैलगाडीसह तलावात शिरले. यावेळी बैलगाडीत असलेल्या आजोबा आणी एका नातवाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. हि घटना गुरुवारी (दि.22) दुपारी धारूर तालुक्यात घडली. 

 

 

धारूर तालुक्यातील कासारी येथील कबीर बाशुमिया सय्यद (वय 70) हे त्यांचे नातू आजमत अखिल सय्यद (वय १०) व आतिक अखिल सय्यद (वय १२) या दोघांना घेऊन वाघदरा तलावाच्या मार्गाने गाव शिवारातील शेताकडे निघाले होते. याच दरम्यान तलावाच्या काठावर असलेल्या रानडुकरांनी बैलांवर हल्ला केल्याने बैल बिथरले आणि तलावाच्या पाण्यात शिरले, पाण्यातून बैल वेगाने जात असताना बैलगाडीसह त्यातील आजोबा आणि नातू बुडाले. 50 फूट बैलगाडीला बैलांनी ओढत नेत होते. यात कबीर सय्यद व आजमत सय्यद या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर आतिक अखिल सय्यद हा एका बैलावर बसून तलावा बाहेर आला त्यामुळे तो वाचला.

 

 

ही थरारक घटना तलावाजवळ जनावरे चालत असलेल्या मोतीराम सदाशिव उघडे या शेतकऱ्याने पाहिली. त्यांनी आरडाओरडा केल्याने तलावाकडे आसपासच्या शेतकऱ्यांनी धाव घेतली. तलावात उडी घेत शेतकऱ्यांनी दोन्ही बैलांना बाहेर काढले. मात्र तोपर्यंत कबीर सय्यद व आजमत सय्यद या दोघांचा बुडून मृत्यू झाला होता. दरम्यान दिंद्रुड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत मयतांचा पंचनामा करत शव 'भोगलवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवले. या घटनेने कासारीसह धारूर तालुक्यात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
 

Advertisement

Advertisement