Advertisement

18 डिसेंबरला विवाह, मात्र बोहल्यावर चढण्याआधीच नवरदेवाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु

प्रजापत्र | Friday, 25/11/2022
बातमी शेअर करा

अंबाजोगाई - बोहल्यावर चढण्याआधीच एका स्थापत्य अभियंत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. बीड  जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली. धीरज तट असे या तरुणाचे नाव असून 18 डिसेंबर रोजी त्याचा विवाह  होणार होता. मात्र विवाहपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. धीरज हा स्थापत्य अभियंता होता. कुटुंबियांकडून त्याच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु होती. मात्र अचानक त्याचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

 

 

अंबाजोगाई शहरातील बँक कॉलनी परिसरात वसंत तट यांचे कुटुंब राहतं. त्यांना दोन मुली आणि धीरज हा एक मुलगा असा परिवार आहे. 26 वर्षांच्या धीरज तट हा स्थापत्य अभियंता आहे. त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण आंबाजोगाईमध्येच पूर्ण केले आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो नोकरीसाठी पुण्याला गेला होता.

 

 

लग्नाची तयारी सुरु असतानाच कुटुंबावर शोककळा
तीन महिन्यापूर्वी धीरजचं लग्न जमलं. मोठ्या धुमधडाक्यात साखरपुडाही झाला. या साखरपुड्याला कुटुंब आणि परिवारातील लोक मोठ्या आनंदाने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे याच साखरपुड्याच्या कार्यक्रमात पुढच्या महिन्यात म्हणजे 18 डिसेंबर रोजी लग्नाचा मुहूर्त काढला. लग्न काही दिवसांवर आल्याने तट कुटुंबीयांच्या घरात लग्नाची तयारी मोठ्या धुमधडाक्यात सुरु होते. एकुलत्या मुलाचा विवाह असल्याने हा सोहळा चांगला करण्याच्या दृष्टीने तट कुटुंबीय व्यस्त असतानाच धीरजला हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला आणित्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

 

 

नातेवाईकांवर लग्नाऐवजी अंत्यसंस्काराला येण्याची वेळ
धीरज तट याचे मूळ गाव हे अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव आहे. त्याच गावी त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले. खरंतर लग्नासाठी येणाऱ्या आप्तस्वकीय, नातेवाईकांना अंत्यसंस्कारासाठी येण्याची वेळ आल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
 

Advertisement

Advertisement