Advertisement

पती-पत्नीला भगरीतून विषबाधा

प्रजापत्र | Monday, 03/10/2022
बातमी शेअर करा

केज : तालुक्यातील आडस येथील पती-पत्नी या दोघांनी भगर खाल्ल्या नंतर काही वेळाने मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाला. विषबाधा झाल्याचे लक्षात येताच दोघांनाही अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. इतर नागरिकांनी भगरीचे सेवन टाळावे असे आवाहन करण्यात येत आहे.

 

 

सध्या नवरात्रोत्सव सुरू असून, या काळात अनेकजण ९ दिवस देवीचे उपवास करतात. यामध्ये फराळासाठी शाबू, भगर सह विविध पदार्थ सेवन केले जातात. परंतु भगर खाणाऱ्यांना मागील काही दिवसांपासून विषबाधा होत आहे. बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशा घटना उघडकीस आल्याने अन्न भेसळ विभाग भगर जप्त करत आहे. भगर खाल्ल्यामुळे विषबाधा झाल्याचे आडस ( ता. केज ) येथे प्रकार समोर आला.येथील प्रदीप चंद्रकांत आकुसकर, वैशाली प्रदीप आकुसकर या पती-पत्नी असलेल्या दोघांनी रविवारी ( दि. २ ) दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास फराळ केला. यामध्ये भगर सेवन केली. एका तासातच २:३० वाजता मळमळ,उलटीचा त्रास सुरू झाला. मागील काही दिवसांपासून भगर खाणाऱ्यांना विषबाधा झाल्याच्या अनेक घटना ऐकण्यात येत असल्याने या दोघा पती-पत्नीला तातडीने अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात ४ वाजण्याच्या सुमारास दाखल करण्यात आले. येथे सध्या दोघांवरही उपचार सुरू आहेत. सदरील भगर शनिवारी आठवडी बाजारातून घेतली असल्याचे सांगितले जात आहे.
 

Advertisement

Advertisement