Advertisement

गेवराईतून 300 किलो भगर जप्त

प्रजापत्र | Tuesday, 27/09/2022
बातमी शेअर करा

बीड-तालुक्यातील जुजगव्हाण व लक्ष्मीआई तांड्यावरील अनेकांना भगरीतून विषबाधा झाल्याची घटना काल समोर आल्यानंतर अन्न प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी यांनी मंगळवारी (दि.27) रात्री 8 च्या सुमारास गेवराईच्या मोंढा भागातील एका दुकानातून 300 किलो भगर जप्त केली आहे.

     नवरात्रौत्सवास सोमवारपासून सुरूवात झाली आहे. घटस्थापनेच्या दिवशी अनेकजण उपवास पकडतात. त्याच अनुषंगाने लक्ष्मीआई तांडा व जुजगव्हाण येथील नागरिकांनी एका दुकानावरून भगरीचे पिठ आणले. ते खाल्याने दुपारनंतर अनेकांना मळमळ, उलटी, जुलाब, चक्कर येणे, थरथर होणे, पोटदुखी असा त्रास होण्यास सुरूवात झाली. काही लोकांनी बीड तर काहींनी ढेकणमोहा येथील खाजगी रूग्णालये गाठले. या सर्वांची प्रकृती स्थिर असून या घटनेने खळबळ उडाली होती.

दरम्यान मंगळवारी गेवराईच्या मोंढ्यात अन्न प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी, अन्न सुरक्षा अधिकारी श्री.गायकवाड यांनी तपासणी मोहीम राबविण्यास सुरुवात केल्यानंतर मोंढ्यातील शितल एजन्सीतून 300 किलो भगर जप्त करण्यात आली. सदरची भगर खाण्यासाठी योग्य नसल्याने या एजन्सीचे मालक प्रमोद गंगावणे यांनी आधीच ही भगर दुकानात एका बाजूला ठेवत त्याची विक्री एकाही ग्राहकाला केली नव्हती अशी माहिती गंगावणे यांनी हाश्मी यांना दिली. या भगरीची बाजारात 20 हजारांच्या घरात किंमत असल्याची माहिती आहे.

Advertisement

Advertisement