Advertisement

श्रीलंकेच्या राष्ट्रपतींचा राजभवनातून पळ:आंदोलकांचा राष्ट्रपती भवनावर ताबा

प्रजापत्र | Saturday, 09/07/2022
बातमी शेअर करा

 श्रीलंकेतील आर्थिक संकटामुळे रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांनी शनिवारी थेट राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांचे सरकारी निवासस्थान ताब्यात घेतले. स्थानिक माध्यमांनी राजपक्षेंनी लंकेतून पळ काढल्याचा दावा केला आहे. श्रीलंकेत प्रदिर्घ काळापासून राष्ट्रपती गोटबायांविरोधात 'Gota Go Gama' व 'Gota Go Home' आंदोलन सुरू आहे.

 

 

सिंहली भाषेत गामाचा अर्थ गाव होतो. आंदोलक एखाद्या ठिकाणी तंबू ठोकून गाड्यांचे हॉर्न वाजवत राष्ट्रपती व त्यांच्या सरकारविरोधात 'गोटा-गो-गामा' ची नारेबाजी करतात. याचा मुख्य हेतू राष्ट्रपती गोटबाया यांना सत्ता सोडण्यासाठी मजबूर करण्याचा आहे.

 

 

आंदोलक राष्ट्रपती भवनाच्या छतावर जावून वाढत्या महागाईविरोधात नारेबाजी करत आहेत.
निदर्शकांचा जत्था गॉल स्टेडिअमपर्यंत पोहोचला आहे. याठिकाणी ऑस्ट्रेलिया-श्रीलंकाचा क्रिकेट सामना सुरू आहे. श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्याही आंदोलनात सहभागी झाला आहे. दुसरीकडे, राजधानी कोलंबोतील आंदोलनही चिघळले आहे. पोलिसांसोबतच्या चकमकीत 100 हून अधिक आंदोलक जखमी झालेत. हाताबाहेर जाणारी स्थिती पाहून पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी आपत्कालीन बैठक बोलावली आहे. पोलिसांनीही निदर्शकांसोबत हातमिळवणी सुरू केली आहे.

 

 

लष्कराची पेट्रोल पंपांवर निगराणी
श्रीलंकेत सर्वसामान्य नागरिकांची दररोज पोलिस, आर्मी व हवाई दलाच्या जवानांसोबत हिंसक झडप होत आहे. कारण, देशभरातील पेट्रोल पंपांवर लष्करातर्फे निगराणी केली जात आहे. देशभरातील नागरिकांत सरकारविरोधात कमालीचा रोष पसरला असून, सर्वत्र दंगल सदृश्य स्थिती उद्भवली आहे. शाळा, महाविद्यालये व रुग्णालयेही बंद आहेत. त्यामुळे तरुण वर्गावर आपल्या कुटुंबीयांची ससेहोलपट पाहण्याची वेळ आली आहे.

 

 

गॅसच्या तुटवड्यामुळे घरातील चूल पेटवण्याची वेळ
केमिकल फर्टिलायझरवरील बंदीमुळे देशात अन्नसंकट निर्माण झाले आहे. स्वयंपाकाच्या गॅसच्या तुटवड्यामुळे जनतेवर घरांतील चुली पेटवण्याची वेळ आली आहे. लंकेतील मध्यमवर्गीय कुटुंबांनीही आपल्या भोजनात कपात केली आहे. कारण, वाढत्या महागाईमुळे ते जीवनावश्यक वस्तु खरेदी करण्यास घाबरत आहेत.

 

 

मे महिन्यात 39.1 टक्के असलेली महागाई जूनमध्ये 54.6 टक्क्यांवर पोहोचली आहे. आपण एकट्या खाद्यान्नाच्या महागाईवर नजर टाकली तर ती मे महिन्यातील 57.4 टक्क्यांवरून जूनमध्ये80.1 टक्क्यांवर पोहोचली आहे.

 

 

स्वातंत्र्यानंतरचे सर्वात मोठे आर्थिक संकट
श्रीलंकन नागरिकांना दररोजच्या वस्तू मिळणेही दुरापास्त झाले आहे. परकीय चलनाची गंगाजळी जवळपास संपली आहे. त्यामुळे लंकेला जीवनावश्यक वस्तूची आयात करता येत नाही. सर्वाधिक तुटवडा इंधनाचा निर्माण झाला आहे. पेट्रोल व डिझेलसाठी अनेक किलोमीटर लांब रांगा लागत आहेत. या प्रकरणी नियमित आंदोलनेही होत आहेत.
 

Advertisement

Advertisement