Advertisement

वाळू स्वस्त करण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार

प्रजापत्र | Tuesday, 24/05/2022
बातमी शेअर करा

बीड : वाळूघाट खुले झाल्यानंतरही जिल्ह्यातील वाळू स्वस्त झाली नसल्याचे प्रजापत्रने समोर आणले होेते. दुसरीकडे आ.लक्ष्मण पवार यांनी वाळूतील माफियागिरीच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत उपोषण सुरु केले आणि वाळूच्या किंमती कमी झाल्या पाहिजेत अशी आग्रही मागणी केली. त्यानंतर राज्यात पहिल्यांदाच वाळू स्वस्त करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला. बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी जिल्ह्यातील वाळू कंत्राटदारांची बैठक घेवून त्यांना वाळूच्या किंमती करण्याचे आवाहन केले आहे.

बीड जिल्ह्यात वाळूचा प्रश्‍न दिवसेंदिवस अधिकच चिघळत चालला आहे. वाळूसाठी मोठ्या प्रमाणावर पैसे मोजावे लागत असल्याने सामान्यांचे घराचे बजेट बिघडले आहे. तर दुसरीकडे अवैध वाळू उपसा जोरात असून यात अनेकजण गब्बर होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनी मंगळवारी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले.

त्यानंतर जिल्हा प्रशासनाने अवैध वाळूवर कारवाई करण्यासाठी महसुल आणि पोलिस अधिकार्‍यांची बैठक घेवून अवैध वाळू उपसा रोखण्यासाठीच्या सूचना दिल्या. तर आ.लक्ष्मण पवार यांनी आक्रमक भूमिका घेत वाळूच्या किंमती कमी करण्यासाठी ठोस पाऊले उचला अशी मागणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी वाळू कंत्राटदारांची बैठक घेवून त्यांना किंमतीवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केले. राज्य सरकारने वाळूच्या लिलावासाठी हातची किंमत कमी केली आहे. त्याचा लाभ जनतेला होऊ द्या. चढ्या दराने कंत्राट मिळालेले असले तरी वाळूचे दर कमी करा असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी सर्वच कंत्राटदारांना केले आहे. एखाद्या जिल्हाधिकार्‍याने वाळू स्वस्त व्हावी यासाठी पुढाकार घेवून कंत्राटदारांना तशी विनंती करण्याचे हे राज्यातले पहिलेच उदाहरण आहे. आता जिल्हाधिकार्‍यांच्या या आवाहनाकडे वाळू कंत्राटदार कसे पाहतात हे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement

Advertisement