Advertisement

श्री क्षेत्र तारकेश्वर गडाच्या विकासासाठी साडे सात कोटींचा निधी

प्रजापत्र | Friday, 13/05/2022
बातमी शेअर करा

आष्टी (प्रतिनिधी) 
श्री क्षेत्र तारकेश्वर गडाच्या विकासासाठी एकूण ७ कोटी ४० लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना.धनंजय मुंडे यांनी केली. 

 

          श्री क्षेत्र तारकेश्वर गडाचे संस्थापक, वाचा सिध्दी साधू श्री संत नारायण महाराज यांच्या ११ व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. श्री क्षेत्र तारकेश्वर गडाचे मठाधिपती गुरुदेव आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास ह.भ. प.अनिल महाराज पाटील (बार्शीकर), ना. धनंजय मुंडे यांच्या सुविद्य पत्नी राजश्री धनंजय मुंडे ,आ. बाळासाहेब आजबे,आ. मोनिका राजळे, सभापती सुनिता शंकर गडाख, मा.आ. भिमराव धोंडे, साहेबराव दरेकर, रामकृष्ण बांगर, भिमराव फुंदे, भाजप जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे,सभापती गोकुळ दौंड, विश्वासराव नागरगोजे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

 

 

यावेळी बोलतांना ना. धनंजय मुंडे म्हणाले की, बीड जिल्ह्यातील नारायण गड, भगवान गड, गहिनीनाथ गड, व तारकेश्वर गड या गडांना वारकरी संप्रदायामध्ये विशेष महत्त्व आहे. गोर गरीब व श्रीमंत अशा सर्व स्तरातील लोक इथे दर्शन व आशीर्वाद घ्यायला येतात. मी स्वतः वारकरी संप्रदायाच्या घरातून आलो आहे. तारकेश्वर गडाचे व माझे जुनेच नाते आहे. २००८ मध्ये मी जेव्हा बीड जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष होतो त्यावेळी तारकेश्वर गडावर आलो होतो. श्री संत नारायण बाबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिलेले आहेत. त्या काळात श्री क्षेत्र तारकेश्वर गडाची पाणी पुरवठा योजना मी मंजूर केलेली होती. तेव्हापासून या गडाचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहे. माझी भक्ती व माझे नाते श्री क्षेत्र तारकेश्वर गड व श्री संत नारायण बाबा यांच्याशी आहे. गडाला पर्यटन विभागाचा ब वर्गाचा दर्जा देण्यासाठी मी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यामुळेच तारकेश्वर गडाच्या सभा मंडपासाठी ४ कोटी रुपये, गड सुशोभीकरणासाठी १ कोटी रुपये, पेव्हर ब्लॉक व हाय मॅक्स साठी ९० लाख रुपये, पाथर्डी ते श्री क्षेत्र तारकेश्वर गड या रस्त्याच्या दु पदरी करण्यासाठी २ कोटी रुपये देण्याची घोषणा मी आपणा सर्वांच्या समक्ष करीत आहे. यापुढेही श्री क्षेत्र तारकेश्वर गडाच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. असे ते म्हणाले. 

 

 

             श्री क्षेत्र तारकेश्वर गडाचे महंत गुरुदेव आदिनाथ महाराज शास्त्री म्हणाले की, श्री संत नारायण बाबांच्या पुण्यतिथी साठी आपण सर्वजण इथे आलात त्यामुळे मला सार्थक झाल्यासारखे वाटते. श्री तारकेश्वर गडाच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा फेटा, शाल, पुष्पहार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आ. बाळासाहेब आजबे, आ. मोनिका राजळे, मा. आ. भिमराव धोंडे, मा. आ. साहेबराव दरेकर,  सुनिता गडाख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सकाळी १० ते १२ यावेळेत ह. भ. प. अनिल महाराज पाटील यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास राज्यभरातून लाखोच्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.
 

Advertisement

Advertisement