Advertisement

४० हजारांच्या लाचप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा

प्रजापत्र | Wednesday, 11/05/2022
बातमी शेअर करा

अंबाजोगाई दि.११(वार्ताहर)-हवेत गोळीबार प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने जामीन दिला असला तरी अंबाजोगाई येथील तहसील कार्यालयातून आरोपींना प्रतिबंधात्मक जामीन मिळविण्यासाठी पोलिस उपनिरीक्षकाने ५० हजारांची लाच मागितली होती. यात तडजोड होवून अखेर ४० हजार देण्याचे ठरले. संबंधीत उपनिरीक्षकाने फिर्यादीस पैशांची मागणी केल्यामुळे आरोपींनी थेट बीडच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीचे फोनवरील संभाषण ग्राह्य धरून एसीबीने तीन वेळा या फौजदारावर ट्रॅप लावला. परंतु, तीनही वेळेस त्यांनी हुलकावणीच दिली. मात्र अखेर चौथ्या वेळेस बुधवारी तडजोडीतील लाचेची रक्कम मिळविण्याचा प्रयत्न केल्यामुळे फौजदाराच्या खाजगी घरी लाचलुचपत विभागाने धाड टाकून त्यांना पकडले. यामुळे पोलिस खात्यात मोठी खळबळ उडाली आहे.

 

      अंबाजोगाई शहरातील हॉटेल व्यवसायीक बालाजी चाटे याचा यावर्षी 28 मार्च रोजी विवाह होता. अंबाजोगाई नजीक बीड रोडवरील एका मंगल कार्यालयात हा विवाह होता. त्याचा हळदी समारंभ 27 मार्च शनिवारी रात्री 10 वाजता झाला. हळदी समारंभ संपल्यानंतर त्याने आपल्या मित्रांसमवेत डिजेवर ताल धरत हवेत गोळीबार केला असल्याची चित्रफित सोशल मिडीयावर व्हायरल होताच पोलिसांनी नामुष्की ओढवताच अखेर नवरदेवासह आणखी एका जणावर अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात उशिराने गुन्हा नोंद केला. या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना न्यायालयाने जामीन दिला. परंतु, गुन्हा दाखल असलेल्या अंबाजोगाई शहर पोलीसांनी माञ त्यांना बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेतून किंवा अंबाजोगाई तहसील कार्यालयातून या दोन्ही आरोपींना जामीन घेणे आवश्यक आहे. यातून बीड स्थानिक गुन्हे शाखेऐवजी अंबाजोगाईच्या तहसील मधून जामीन मिळवून देण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक गोपाळ सुर्यवंशी यांनी या दोन्ही आरोपींना 50 हजारांची मागणी केली. यात तडजोड होवून अखेर 40 हजार रूपये देण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे रक्कम तयार असताना ही सुर्यवंशी हे दोन्ही तक्रारदारांना सतत चकवा देवू लागले. यानंतर त्यांनी बीडच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार केल्यानंतर फोन वरील संभाषणाची खातरजमा करून लाचलुचपत विभागाचे उपअधिक्षक शंकर शिंदे यांनी त्यानुसार दिनांक 2 मे, 4 मे व 7 मे रोजी त्यांच्यावर सापळा रचण्यात आला. या तिनही वेळेस लाचलुचपत विभागाच्या सापळ्यातून सदर पोलिस उपनिरीक्षक निसटले होते. यानंतर आज बुधवार, दिनांक 11 मे रोजी सुर्यवंशी यांच्यावर सापळा रचण्यात आला. त्यांनी तत्पूर्वी पोलीस ठाण्यानंतर अंबाजोगाईतील छत्रपती शिवाजी महाराज चौक, भारतरत्न राजीव गांधी चौक आणि मोरेवाडी नजीकच्या यशवंतराव चव्हाण चौक आदी तीन भेटीची ठिकाणे बदलून अखेर त्यांच्या खाजगी निवासस्थानी अँथ्रासिन पावडर लावलेली लाचेची रक्कम मिळविण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांना रंगेहाथ पकडले. ही धाड पडल्याचे समजताच अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात एकच खळबळ उडाली. याच प्रकरणात आणखी दोन पोलीस कर्मचारी असल्याची चर्चा दिवसभर शहरात सुरू होती. परंतु, पोलिस उपनिरीक्षक गोपाळ दिगंबर सुर्यवंशी यांनाच ही लाचेची रक्कम मिळविण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांच्यावर अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम-1988 कलम 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब पवार हे करीत आहेत.
 

Advertisement

Advertisement