Advertisement

मादळमोही येथील उद्योजकाचे अपहरण करुन 2 कोटींची मागणी

प्रजापत्र | Sunday, 30/01/2022
बातमी शेअर करा

गेवराई : तालुक्यातील मादळमोही येथील एका व्यवसायिकाचे अज्ञात पाच जणांनी दोन दिवसांपूर्वी साठेवाडी फाटा येथून अपहरण केले होते. दरम्यान तोंडात बोळा व हातपाय बांधून बेदमपणे मारहाण करत सदरील व्यापाऱ्यास वडीगोद्री (ता.अंबड) जवळ फेकून दिले. तसेच यावेळी अपहरणकर्त्यांची एक स्कार्पिओ बंद पडल्याने त्यांनी ती तेथील पाटात ढकलून देवून अन्य एका स्कार्पिओमधून पोबारा केला होता. बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान या घटनेचा चकलांबा पोलिसांनी दोन दिवसांत छडा लावला असून चार आरोपींच्या अहमदनगर येथे मुसक्या आवळल्या. तर या घटनेचा मुख्य सुत्रधार आरोपी अद्याप फरार आहे.

 

 

 

या प्रकरणाची माहिती अशी की, मादळमोही येथील उद्योजक कैलास शिंगटे यांना बुधवारी सायंकाळी पोकलेन भाड्याने लावायचे आहे म्हणून बोलावून घेत त्यांच्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या स्कार्पिओने धडक दिली. यावेळी स्कार्पिओतील अपहरणकर्त्यांनी शिंगटे यांना उचलून स्कार्पिओमध्ये टाकले. यानंतर त्यांच्या तोंडात बोळा कोंबून हातपाय बांधले. तसेच डोळ्यावर पट्टी बांधून मारहाण करत तब्बल 2 कोटींची मागणी केली. यावेळी 2 कोटी देण्यास नकार दिल्याने दाबणाने त्यांच्या शरीरावर जखमा करुन छळ केला. दरम्यान वडीगोद्रीजवळील डाव्या कालव्याजवळ सदरील स्कार्पिओ बंद पडल्याने ती कालव्यात ढकलून दिली. याठिकाणी शिंगटे यांच्या खिशातील त्यांचे व त्यांच्या पत्नीचे आधार कार्ड, पँन कार्ड व अन्य काही कागदपत्रे टाकली, व अन्य एका स्कार्पिओमध्ये शिंगटे यांना टाकून पुढे काही अंतरावर शिंगटे यांना देखील चालत्या स्कार्पिओमधून बाहेर फेकले.

 

 

 

दरम्यान कालव्यात पडलेली स्कार्पिओ काही जणांच्या निदर्शनास आल्यानंतर याठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली. तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता सदरील ठिकाणी शिंगटे यांचे काही कागदपत्रे आढळून आले. त्यानुसार शिंगटे यांच्या कुटूंबांशी संपर्क साधला असता, त्यांची दुचाकी साठेवाडी याठिकाणी असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. तर काही वेळात शिंगटे यांचा त्यांच्या वडिलांना फोन गेल्यानंतर त्यांनी घडलेल्या घटनेची आपबीती सांगून मी वडीगोद्रीजवळ असलेल्या एका हाँटेलवर असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांना माहिती देताच त्याठिकाणी पोलिसांनी धाव घेतली. याप्रकरणी शिंगटे यांचा गोंदी पोलिसांनी जवाब नोंदवला गेला. तसेच हे प्रकरण चकलांबा पोलिस ठाणे हद्दीत घडल्याने या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

 

 

दरम्यान गुन्हा दाखल होताच चकलांबा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली, आणि दोन दिवसात छडा लावून आरोपींच्या मुसक्या आवळल्या. काल रात्री अहमदनगर येथून चार जणांना चकलांबा पोलिसांनी अटक केली असून यामधील तीन आरोपी गेवराई तालुक्यातील बेलगाव येथील आहेत. तर अन्य एक आरोपी अहमदनगर जिल्ह्यातील, सांगवी येथील आहे. हि कारवाई डिवाएसपी स्वप्नील राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पवार यांनी केली.

 

 

 

दरम्यान या घटनेचा मुख्य सुत्रधार अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपींनी आम्ही केवळ मदत केल्याचे सांगितले आहे त्यामुळे मुख्य सुत्रधार अटक झाल्यानंतरच या घटनेचे रहस्य समोर येईल. तर अटक करण्यात आलेल्या आरोपींना आज कोर्टासमोर हजर केले असता त्यांना 2 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

 

असा लागला छडा….

अपहरण करण्यात आलेल्या शिंगटे यांना फोन करून बोलविण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांनी काँल हिस्ट्री व पाटात ढकलून देण्यात आलेल्या गाडीवरून या घटनेचा तपास करुन आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

Advertisement

Advertisement