Advertisement

गेवराईत वाळू माफियांना दणका

प्रजापत्र | Friday, 31/12/2021
बातमी शेअर करा

गेवराई : तहसीलदार सचिन खाडे यांनी आज शुक्रवार रोजी अवैध वाळू उपसा व वाहतूकीविरोधात मोठी मोहीम राबविली. तालुक्यातील राक्षसभुवन तसेच म्हाळसपिंपळगाव याठिकाणी धाड टाकून सहा ट्रँक्टर, लोडर तसेच ८ केनीसह जवळपास १ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईने वाळू माफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

 

 

तहसीलदार सचिन खाडे हे मागील दहा-बारा दिवसांपासून मेडिकल रजेवर गेल्यानंतर वाळू माफियांनी गोदापात्रात नंगानाच सुरु केला होता. दिवसरात्र वाळू उपसा करुन ती वाहतूक केली जात होती. यातच चार दिवसांपूर्वी राक्षसभुवन फाट्यावर वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव वेगातील ट्रँक्टरने दुचाकीस्वाराला पाठीमागून धडक दिल्याने या घटनेत दुचाकीस्वार तुकाराम निंबाळकर (रा.खामगाव ता.गेवराई) यांचा जागीच मृत्यू झाला होता. यानंतर ग्रामस्थांसह विविध पक्ष, संघटनेच्या पदाधिकारी यांनी उपजिल्हा रुग्णालयात ठिय्या मांडून ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यामुळे याठिकाणी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांना येऊन आंदोलनकर्त्यांची समजून काढावी लागली होती. या घटनेनंतर तरी अवैध वाळू उपसा व वाहतूक बंद होईल असे वाटत होते. मात्र हि आशा निष्फळ ठरली, वाळू उपसा काही केल्या बंद झाला नाही.

 

 

दरम्यान रजेवर गेलेले तहसीलदार सचिन खाडे हे आज सकाळी पुन्हा रुजू झाले. यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांसह राक्षसभुवन व म्हाळसपिंपळगाव याठिकाणी गोदावरी पात्रात धाड टाकली. यावेळी म्हाळसपिंपळगाव येथून १ वाळूने भरलेले ट्रँक्टर, ८ वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या केनी ट्रँक्टरसह जप्त करण्यात आल्या. तसेच राक्षसभुवन येथे देखील तहसीलदार सचिन खाडे यांच्या पथकाने धाड टाकून ५ ट्रँक्टर केनी व लोडरसह ताब्यात घेण्यात आले. या दोन्ही कारवाईत जवळपास १ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हि कारवाई करण्यात आलेली वाहने गेवराई तहसील कार्यालयात लावण्यात आली आहेत. या कारवाया तहसीलदार सचिन खाडे, नायब तहसीलदार जाधवर यांच्यासह गेवराई तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल तसेच शिरुर तहसीलचे मंडळ अधिकारी, तलाठी यांनी केली. या कारवाईने वाळू माफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.

Advertisement

Advertisement