Advertisement

मराठवाड्यात ओमायक्रॉनचा शिरकाव

प्रजापत्र | Monday, 13/12/2021
बातमी शेअर करा

लातूर : जिल्ह्यात ओमायक्रॉनचा ( Omicron Variant ) पहिला रुग्ण आढळला असून त्याच्यावर आरोग्य विभागाच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, त्याच्या संपर्कातील व्यक्तींची कोरोना चाचणी (Corona Virus In Latur ) करण्यात आली असून सर्वांचाच अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

 

औसा नगरपालिकेच्या हद्दीतील रहिवासी असलेला हा रुग्ण दुबई येथून सहा दिवसांपूर्वी गावाकडे आला आहे. परदेशातून आल्यामुळे आरोग्य विभागाने त्याची कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली होती. तद्नंतर त्यांची ओमायक्रॉनची चाचणी करण्यासाठी पुणे येथे नमुने पाठविण्यात आले होते. सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अहवाल प्राप्त झाला असून, ती व्यक्ती ओमायक्रॉन पॉझिटिव्ह असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख यांनी सांगितले. सध्या त्याच्यावर शासकीय कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असून प्रकृती ठणठणीत आहे.

 

लातूर जिल्ह्यात परदेशातून ९२ व्यक्ती परतल्या आहेत. त्यापैकी ८० व्यक्तींचा शोध लागला असून १२ जणांचा शोध आरोग्य विभागाकडून घेतला जात आहे. संपर्क झालेल्यांपैकी ६५ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यापैकी दोघांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून त्यातील एकाला ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटची लागण झाली आहे. यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाले आहे. परदेशातून आलेल्या सर्वांशी संपर्क साधला जात आहे.

 

४८ जणांचा अहवाल निगेटिव्ह...

परदेशातून आलेल्या ९२ पैकी ६५ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यापैकी दोघे कोरोनाबाधित आहेत. ४८ जणांचा अहवाल निगेटिव्ह असून १५ जणांचा अहवाल प्रलंबित आहे. १२ व्यक्तींशी संपर्क झालेला नाही. त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे यांनी सांगितले.

 

रुग्णाची प्रकृती स्थिर, संपर्कातील व्यक्तीचा शोध...

 

आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेल्या औसा येथील या रुग्णाच्या संपर्कातील नातेवाइकांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तरीही खबरदारी म्हणून रहिवासी परिसरात कंटेन्मेंट झोन तयार करण्यात येत आहे. तसेच संपर्कातील व्यक्तीचा शोध घेऊन चाचणी करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, जिल्ह्यात सद्यस्थितीत केवळ ३० रुग्ण कोरोनाबाधित आहेत. सोमवारी ६०६ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात केवळ एक जण कोरोनाबाधित आढळला असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, लसीकरण करावे, नियमांचे अनुपालन करावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सकांनी केले आहे.

Advertisement

Advertisement