Advertisement

अंबाजोगाईनजीक वृद्ध महिलेचा मृतदेह सापडला

प्रजापत्र | Friday, 19/11/2021
बातमी शेअर करा

अंबाजोगाई-शहरापासून जवळच आडस रोडवरील शेतातील झुडुपात एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठवून दिला. सदरील मृत महिला चनई येथील असून तिचा खून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी एका संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे. 

                सरूबाई हरिभाऊ वारकड (वय ६०, रा. चनई, ता. अंबाजोगाई) असे त्या मृत महिलेचे नाव आहे. सरूबाई यांची शेतजमीन गावापासून अंदाजे तीन-चार किमी अंतरावर आहे. त्या दररोज शेतात जात असत. मात्र, चार दिवसापूर्वी शेतात गेल्यानंतर त्या घरी परतल्या नव्हत्या. त्यामुळे नातेवाईकांनी त्या बेपत्ता झाल्याची माहिती देण्यासाठी शुक्रवारी (दि.१९) सकाळी अंबाजोगाई शहर ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलीस निरिक्षक बाळासाहेब पवार यांच्या सूचनेवरून उपनिरिक्षक गोपाळ सूर्यवंशी यांनी चौकशी केली असता त्यांना सरूबाईचा मृतदेह चनईपासून चार किमी अंतरावर आडस रोडवरील शेतात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी शेतात जाऊन पाहणी केली असता एका शेळीपालन फार्म जवळ झुडुपाच्या खाली सरूबाई यांचा मृतदेह आढळून आला. प्रथमदर्शनी हा खुनाचा प्रकार असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठवून दिला . शनिवारी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतरच सरूबाईचा मृत्यू कशाने झाला हे स्पष्ट होऊ शकणार आहे.

Advertisement

Advertisement