Advertisement

तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

प्रजापत्र | Monday, 08/11/2021
बातमी शेअर करा

लातूर दि.८ – निसर्गाचा प्रकोप झाला की काय होते याचा प्रत्यय मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीच्या दरम्यान आला आहे. ज्या नदीच्या पाण्यावर उत्पादन वाढीचे स्वप्न पाहिले जात होते त्याच नदीचे पाणी शेतात घुसल्याने अवघ्या काही वेळात पिकासह शेतजमीन खरडून गेली होती. त्यामुळे हताश झालेल्या तरुण शेतकऱ्याने त्याच नदी पात्रात उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपवलेली आहे.

 

मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. लातूर जिल्ह्याच्या शिरुरअनंतपाळ तालुक्यातील डोंगरगाव येथील एका तरुण शेतकऱ्याने बॅंकेच्या कर्जाची परतफेड करायची कशी तसेच पिकांची नुकसानभरपाई मिळाली मात्र, खरडून गेलेल्या शेतजमिनीचे काय? या प्रश्नांनी अस्वस्थ झालेल्या 25 वर्षीय अजित बन या शेतकऱ्याने नदी पात्रातच उडी घेऊन आत्महत्या केली आहे. डोंगरगाव येथील अजित बन यांना मांजरा नदीपात्राला लागूनच शेतजमीन होती. अतिवृष्टीने खरीपातील सोयाबीन, उडीद, मुगाचे तर नुकसान झालेच पण नदी पात्रातील पाणी थेट श्री.बन यांच्या शेतामध्ये घुसले होते. त्यामुळे पिकाची तर  वहिवाट लागली परंतु शेत जमिनही खरडून गेली. नुकसान भरपाईच्या अनुषंगाने सरकारने तुटपूंजी का होईना मदत केली. मात्र, ज्यांची शेतीच खरडून गेली आहे, त्यांच्याबाबत काहीच निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे अजित बन यांना नैराश्य आले होते. शिवाय त्यांनी पीक पेरणीसाठी कर्जही घेतले होते. पण आता शेतीच राहिली नाही तर कर्जफेड करायची कशी असा प्रश्न त्यांच्या समोर होता. यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.

 

खरीप हंगामातील पेरणीसाठी त्यांनी बॅंकेचे तर कर्ज काढले होतेच शिवाय मित्र आणि नातेवाईक यांच्याकडून पैसे घेऊन खरीप हंगामातील पेरणी केली होती. मात्र, पिक जोमात असतानाच निसर्गाची अवकृपा झाली आणि बन यांच्या शेतीचे होत्याचे नव्हते झाले. वाढते कर्ज आणि परतफेडसाठी काही साधनच नसल्याने ज्या नदीपात्रातील पाण्यामुळे नुकसान झाले त्याच नदीत उडी घेऊन जीवन संपवले. राज्य सरकारने शेतकऱ्यांना तुटपूंजी मदत केली आहे. शिवाय यामध्येही केवळ 75 टक्केच रक्कम अदा केली आहे. शेतकऱ्यांचे पिकच नाही तर सर्वस्वच वाहून गेली आहे. या दाहकतेची जाणीव सरकारला राहिलेली नाही.

 

दरम्यान, मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होत असताना मराठवाड्यातील मंत्री काय झोपा काढताता का असा सवाल आ. संभाजी पाटील-निलंगेकर यांनी उपस्थित केला आहे. विदर्भासाठी वेगळा न्याय आणि मराठवाड्यासाठी वेगळा न्याय अशी भूमिका सातत्याने राज्य सरकार घेत आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. ही बाब मराठवाड्यातील मंत्र्यांच्या निदर्शनास येत नाही काय? असा सवाल आ. संभाजी पाटील-निलंगेकर यांनी उपस्थित केला.

Advertisement

Advertisement