Advertisement

डॉक्टर तरुणीला दोन लाखांचा गंडा

प्रजापत्र | Sunday, 26/09/2021
बातमी शेअर करा

अंबाजोगाई : लग्न जुळवणाऱ्या मॅट्रीमोनीअल वेबसाईटवर झालेलीं ओळख अंबाजोगाई तालुक्यातील एका डॉक्टर तरुणीस चांगलीच महागात पडली आहे. ओळखीचा फायदा घेत एका तरुणाने कस्टममध्ये अडकलेली बॅग सोडवण्याचा बहाणा करून त्या तरुणीला १ लाख ९५ हजार रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी त्या तरुणासह दोघांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

 

अंबाजोगाई तालुक्यातील एक डॉक्टर तरुणी मुंबईच्या जेजे हॉस्पिटलमध्ये नोकरीस आहे. तिच्या फिर्यादीनुसार, यावर्षी जून महिन्यात तिची एका मॅट्रीमोनीअल वेबसाईटवर राहुल चांदेकर याच्यासोबत ओळख झाली. त्यानंतर दोघात व्हाॅट्सॲपवर मेसेज सुरु झाले आणि दोघात मैत्री झाली. १ जुलै रोजी राहुलने तिला कॉल केला आणि तो लंडनला असून काही दिवसात मुंबईला स्थायिक होणार असल्याचे सांगितले. परंतु, माझी एक लगेज बॅग दिल्ली विमानतळावर कस्टमचे पैसे न भरल्याने अडकली आहे, ती बॅग तू पैसे भरून सोडूवून घे आणि तुझ्याकडे ठेव, मी आल्यावर घेतो अशी बतावणी राहुलने केली. थोड्याच वेळात एका मोबाईलवरून त्या तरुणीला कॉल आला आणि समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने दिल्लीच्या कस्टम ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगून तिला पैसे भरण्यासाठी बँकेचा खाते क्रमांक दिला. या सर्व भूलथापांना बळी पडून त्या तरुणीने विविध व्यवहारातून एकूण १ लाख ९५ हजार रुपये त्या खात्यावर जमा केले. संशय आल्याने त्या तरुणीने कस्टम डिपार्टमेंटमध्ये चौकशी केली असता अशा कोणत्याही व्यक्तीच्या नावे तिथे बॅग नसल्याचे तिला समजले. त्यानंतरही राहुलने तिला पैसे पाठविण्यासाठी आग्रह धरला. परंतु फसवणूक झाल्याचे लक्षात आले असल्याने तिने थेट अंबाजोगाई शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. सदर तक्रारीवरून राहुल चांदेकर सह एका मोबाईल क्रमांकावरून बोलणाऱ्या अनोळखी व्यक्तीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

Advertisement

Advertisement