Advertisement

नरेगाच्या कामात १७ लाखांचा अपहार

प्रजापत्र | Saturday, 18/09/2021
बातमी शेअर करा

अंबाजोगाई-नरेगाच्या कामातील घोटाळ्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून अंबाजोगाई तालुक्यात नरेगाच्या कामात १७ लाखांचा अपहार प्रकरणी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचा शाखा अभियंता, माध्यमिक शाळेतील शिक्षक आणि पोस्टमनवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने बर्दापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला. 
         अंबाजोगाई तहसीलचे नायब तहसीलदार गणेश सरोदे यांनी याप्रकरणी पोलिसात फिर्याद दिली होती. त्यांच्या फिर्यादीनुसार, मौजे पत्तीवडगाव ते फावडेवाडी रस्ता काम भाग ०२ हा १७०० ते ३४०० एम या रस्त्याचे खडीकरण व मजबुतीकरण काम महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत सन २०१४ ते १५ मध्ये करण्याबाबत अंबाजोगाई तहसीलदारांनी १२ जानेवारी २०१५ रोजी कार्यारंभ आदेश दिला होता. सदर कामाची यंत्रणा जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग अंबाजोगाई ही होती. मात्र, येथील तत्कालीन शाखा अभियंता एम.एस. चव्हाण याने सदर रस्त्याच्या कामाचे चुकीचे अंदाजपत्रक तयार केले. तसेच, रस्त्याचे कोणतेही काम न करता त्याबाबत मोजमाप पुस्तिकेत नोंदी घेतल्या व त्याबाबतचे बोगस देयके तयार करून शासनाची फसवणूक केली. तर, या कामासाठी परळी तालुक्यातील लाडझरी येथील अनुदानित शिक्षण संस्थेतील माध्यमिक शिक्षक दिनकर लव्हारे यांस ठेकेदार दर्शवून शासनाची आर्थिक फसवणूक केली. तसेच, पट्टीवडगाव येथील पोस्टमन पंडित ज्ञानोबा पोकळे याने अभियंता चव्हाण आणि शिक्षक दिनकर लव्हारे या दोघांसोबत संगनमत करून मयत आणि इतर व्यक्तीच्या नावे बोगस खाते काढले व त्यांच्या नावे जमा झालेली अकुशल मजुरांची देयके परस्पर काढून घेत शासनाची आर्थिक फसवणूक केली. हा सर्व अपहार १७ लाख ८ हजार ४६८ रुपयांचा असून हि संपूर्ण रक्कम उचलूनही रस्त्याचे कोणतेच काम झाले नाही. 

 

 
पोलीस तपास सुरु
नायब तहसीलदार सरोदे यांच्या फिर्यादीवरून तिन्ही आरोपींवर कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, ४०९, ३४ अन्वये बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक खरात करत आहेत. सध्या पोलीस तपास सुरु असून अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नसल्याची माहिती पीएसआय खरात यांनी दिली.

Advertisement

Advertisement