Advertisement

ग्रामरोजगार सेवकासह संगणक परिचालकावर गुन्हा

प्रजापत्र | Friday, 17/09/2021
बातमी शेअर करा

अंबाजोगाई दि . १७( वार्ताहार ):-  जिल्ह्यात रोजगार हमी योजनेचा कसा गैरफायदा घेतला जातो हे अनेकदा स्पष्ट झालेले आहे . आता तर ग्रामरोजगार सेवक आणि संगणक परिचालकाने थेट शेतकऱ्यांना रोहयोच्या विहीरीचे आमिष दाखवत त्यांची महत्वाची कागदपत्रे व फोटो हस्तगत केले . त्याच आधारे नंतर विहीरीच्या कामकाजासाठीच्या हजेरी मस्टरची बनावट प्रति व कागदपत्रे तयार करुन विहीरीचे अनुदान व शेतकऱ्यांचे बनावट बँक खाते उघडून त्यांना रोहयोचे  मजुर दाखवून तब्बल ३ लाख ३३ हजार ७५४ रुपये परस्पर हडप केले . या प्रकरणात दोघांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात (दि . १५) सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल झाला . भास्कर ज्ञानोबा फुंदे ( ग्रामरोजगार सेवक , उमराई , ता.अंबाजोगाई ) व नितीन जनार्धन केंद्रे ( संगणक परिचालक , ग्रामपंचायत कार्यालय , उमराई ) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत . याबाबत उमराई येथील शेतकरी शिवाजी दगडू केंद्रे यांनी शहर ठाण्यात फिर्याद नोंदवली . सन २०१७ ते १५ सप्टेंबर २०२१ या कालावधीत उमराई येथे हा सारा प्रकार घडला . शिवाजी केंद्रे यांना नितीन व भास्कर या दोघांनी  विश्वासात घेतले . आम्ही तुमच्या शेतात महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत विहीर मिळवून देतो असे सांगत शिवाजी केंद्रे यांच्याकडून सात बारा , आधार कार्ड , नमुना ८ - अ व फोटो घेतले . याच कागदपत्राच्या आधारे बनावट कागदपत्रे तयार केली . त्यानंतर विहीर कामकाजाच्या हजेरी मस्टरची बनावट प्रत काढून बील उचलले . तसेच शिवाजी केंद्रे व इतर शेतकऱ्यांचे बनावट खाते उघडून त्यांना रोहयोचे मजुर दाखवून ३ लाख ३३ हजार ७५४ रुपयांची रक्कम हडप करुन शेतकऱ्यांसह शासनाची फसवणूक केली . त्यावरुन दोघांवर गुन्हा दाखल झाला . उपनिरीक्षक भालेराव या प्रकरणाचा तपास करत आहेत .
 शेतकऱ्यांना फसविणे आले अंगलट

 

Advertisement

Advertisement