Advertisement

कोरोनामुळे कुंचल्यासोबत चित्रकाराचा जीवनरंगही सुकला !

प्रजापत्र | Sunday, 25/04/2021
बातमी शेअर करा

परळी-वैजनाथ (प्रतिनिधि)- सरस्वती आणि लक्ष्मी एकत्र नांदत नाहीत याची प्रचिती समाज जीवनात वावरताना येते. कल्याण वासुदेवराव तारे या चित्रकाराचे जीवन त्याचेच मूर्तिमंत उदाहरण. अंगात चित्त आकर्षूण घेणारी कला असली तरी आपल्याकडील कलासक्त दर्दीची वानवा आणि आता  कोरोनाने  शैक्षणिक क्षेत्राच्या विस्कटलेल्या घडीमुळे पदरी पडलेल्या बेरोजगारीने तारे यांचा जीवनाचा रंगच उडाला आहे. परळीच्या भूमिपुत्राचा औरंगाबादेत सुरू असलेला जीवनसंघर्ष मन हेलावून सोडणारा आहे.

 

कल्याण तारे यांचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण परळीतील वैद्यनाथ विद्यालयात झाले. शाळेत त्यांची उत्तम चित्रकलेतला विद्यार्थी अशीच त्यांची ओळख होती. त्यांचे चित्रकलेचे पुढील शिक्षण औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयातून झाले. ९o च्या  दशकात त्यांनी आर्ट टिचर डिप्लोमाचे (ATD) शिक्षण पूर्ण केले. पूर्णवेळ चित्रकारितेचे व्रत घेऊन आयुष्य चित्रकलेलाच समर्पित म्हणून त्यांचे जगणे सुरू झाले. नव्या पिढीतही चित्रकलेचा संस्कार रुजवणे या विचाराने तारे यांनी एका शाळेत चित्रअध्यापनाचे काम सुरू केले. तेथील त्यांच्या कला साधनेतून अनेक महापुरूष, भारतरत्नांची पोट्रेट चितारण्यातून आकारास आली. त्यांच्या कुंचल्यातून हुबेहुब व्यक्तीचित्र साकारली गेली. त्याची फलश्रुति म्हणून औरंगाबादेतीलच दुसऱ्या शाळेकडून चित्र अध्यापनाची संधी त्यांना चालून आली. त्यांनी ती स्वीकारली. तेथेही चित्रकला साधना सुरूच राहिली.

 

विनाअनुदानित  शाळेकडून मिळणाऱ्या जेमतेम वेतनावर आपल्या चौकोनी कुटुंबाचा उदरनिर्वाह  चालवू लागले. मात्र गतवर्षी मार्चमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू लागला आणि त्याला थोपवण्यासाठी देशभर संपूर्ण लॉकडाऊन लागू झाला. सारे काही थांबले. शाळा बंद. ऑनलाईन शिक्षण सुरू. मात्र कलेचे शिक्षण गरज नाही म्हणून थांबवले. चित्रकलेच्या शिक्षकांना घरीच थांबण्याच्या सूचना आल्या. काही शाळांनी कला, क्रीडा, नृत्यकला शिकवणाऱ्या शिक्षकांना काम थांबवण्याचे आदेश दिले. अशा गुणवंत शिक्षक मंडळींवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. तारे यांच्यासारख्या घरातील एकमेव करता पुरूषापुढे जगण्याचा प्रश्न निर्माण झाला.

 

 

त्यात बीएस्सीच्या मायक्रोबायोलॉजीचे शिक्षण घेणाऱ्या जुळ्या मुलांच्या संस्थेकडून शुल्क भरण्याचा संदेश आला. तारे यांना स्वतःसह मुलांचे भवितव्यही अंधःकारमय दिसू लागले. चिंतायुक्त परिस्थितीमुळे जीवनाचा रंग उडून गेला असे वाटू लागले. काही मदतीचे हात पुढे आल्यामुळे मुलांची शुल्क भरण्याच्या परिस्थितीतून तारे तरले. पण जगण्याचा संघर्ष कायम राहिला. हाती नोकरी नाही. वेतनही नाही. चित्रकलेचे काम नाही. सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या तारे यांच्यावर पै- पै साठी झगडण्याची वेळ आली. हातातील कुंचला फिरवण्यासाठी रंग- पोट्रेट, कागद आणण्याचाही यक्षप्रश्न तारें पुढे उभा राहिला. त्यातून कलासक्त मंडळींची वानवा. त्यामुळे अर्थार्जनही होण्याची सूतराम शक्यता मावळली. पेन्सिलने कागदावर रेखाटलेल्या चित्रांमध्ये रंगांमधून प्राण ओतणाऱ्या तारे यांचे जीवन म्हणजे जगण्याचा एक संघर्ष होऊन बसले आहे.

Advertisement

Advertisement