Advertisement

शिक्षक, तलाठी,विस्तार अधिकारी यांची घरे फोडली

प्रजापत्र | Sunday, 28/03/2021
बातमी शेअर करा

किल्लेधारूर -पोलीस राहत असलेल्या इमारतीतच शिक्षक, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, तलाठी यांचे घर फोडून ४९ हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. 
                होळी सणासाठी सर्व जण गावाकडे गेल्याची संधी पाहून चोरट्यांनी डल्ला मारला. या प्रकरणी शिक्षक प्रभु विठ्ठल तिडके यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यां विरोधात धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.धारूर येथील शिक्षक कॉलनीमध्ये आसरडोह रोड लगत बंडू मुंडे यांची दोन मजली इमारत आहे.या इमारतीमध्ये शिक्षक प्रभू विठ्ठल तिडके, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री.राठोड,तलाठी श्रीमती आलुरे,पोलिस जमादार राजेश राठोड राहत आहेत.होळी सणानिमित्त शनिवारी सर्वजण गावाकडे गेले होते.या इमारतीमध्ये कोणीच राहत नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्यांनी शिक्षक प्रभू तिडके यांचे रूमचा दरवाजा तोडून बोरमाळ १२ हजार, सोन्याचे ठसे ४ हजार, एक नथ १ हजार तर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी राठोड यांच्या रूममधील पाच मास्याची अंगठी,१२ हजार रुपये,  चांदीची चैन,पाचशे रुपये, बाजीगर २ हजार व नगदी पाच हजार रुपये असा ऐवज लंपास केला तर तलाठी श्रीमती आलुरे यांच्या घरातील रूममधील ही साहित्य लंपास केले असून त्या रविवारी धारूमध्ये आल्या नव्हत्या.
पोलिस जमादार राजेश  राठोड यांच्या रूमच कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला परंतु ती जाड असल्यामुळे तुटले नाही.चोरट्यांनी सर्व साहित्य अस्ताव्यस्त फेकले होते.कपाट, पेट्या यांचे कुलपे तोडली होती. प्रभू तिडके यांना आपल्या रूममधील चोरी झाल्याचे रविवारी दुपारी लक्षात आले. या प्रकरणी शिक्षक प्रभू विठ्ठल तिडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धारूर पोलीस ठाण्यांमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोलिस जमादार गोविंद बाष्टे  करीत आहेत.

Advertisement

Advertisement