Advertisement

शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या मालकीच्या जागेत सुरु होता क्लब , पोलिसांनी दिला झटका

प्रजापत्र | Sunday, 19/07/2020
बातमी शेअर करा

बीड : स्थानिक गुन्हे शाखा आणि बीड शहर पोलिसांनी शनिवारी सायंकाळी ज्या क्लबवर कारवाई केली तो क्लब चक्क शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांच्या  मालकीच्या जागेत सुरु होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी दाखल गुन्ह्यात सदर उल्लेख असल्याने राजकारणी आणि अवैध धंदे यांच्यातील संबंध पुन्हा समोर आले आहेत. 
बीड शहराच्या पोद्दार इंग्लिश स्कुल जवळच्या एका शेड मध्ये असलेल्या क्लबवर शनिवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलिसांनी छापा मारला होता. मिळालेल्या माहितीनुसार बीड शहरात अनेक महिन्यांपासून सदर क्लब सुरु होता. परिसरातील नागरिकांनी यासंदर्भात अनेकदा पोलिसांना तक्रारी देखील केल्या होत्या. मात्र या क्लबला राजकीय वरदहस्त असल्याचे सांगितले जायचे. आता शनिवारी या क्लबवर छापा मारल्यानंतर याबाबतची माहिती समोर आली असून सदर क्लब कुंडलिक  हरिभाऊ खांडे याच्या मालकीच्या जागेत सुरु होता असे समोर आले आहे. हे कुंडलिक खांडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत. 
बीड जिल्ह्यात राजकीय वरदहस्ताखाली अवैध धंदे सुरु आहेत. आता स्थानिक गुन्हे शाखेचे साहायक पोलीस निरीक्षक आनंद कांगुणे यांनी काही ठिकाणी छापे मारले असून बीड शहर पोलीस ठाण्याचे गजानन जाधव यांनी देखील कारवाई सुरु केली आहे. बीड जिल्ह्यात अनेक अवैध धंद्यांमध्ये राजकीय व्यक्तीचीच नावे समोर येत आहेत. गुटखा, वाळू आणि क्लब यामध्ये असणारे राजकीय धागेदोरे यातून समोर आले असून सत्ताधारी पक्षांचाच या धंद्यांना पाठिंबा आहे का असा सवाल उपस्थित होत आहे.

 संग्रामानंतर कारवाई 
दरम्यान कालच्या छाप्याच्या संबंधाने आणखी एक माहिती समोर आली आहे. पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका क्लबवर स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारला होता , त्यातील आरोपी हा एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याने त्या पक्षाच्या नेत्याने पोलीस अधिकाऱ्यांसोबत 'संग्राम ' मांडत आमचेच कार्यकर्ते दिसतात का असा सवाल केला आणि त्या 'मेटाकुटीतून ' ही मोठी कारवाई झाल्याची चर्चा आहे. 

 

Advertisement

Advertisement