Advertisement

गुंगीचे औषध देऊन वृद्धाला लुटले

प्रजापत्र | Thursday, 11/02/2021
बातमी शेअर करा

केज- आठवडी बाजारातील बिटवर भाजीपाला विक्री करून बाजार करीत असलेल्या वृद्धाला थाप मारून एका भामट्याने शहराबाहेर नेले. वाटेत शितपेयातून गुंगीचे औषध देऊन वृद्धाच्या हातातील अंगठी आणि खिशातील 10 हजार रुपये असा 31 हजाराचा ऐवज घेऊन भामट्याने पोबारा केल्याची घटना केज तालुक्यातील साळेगाव रस्त्यावर घडली.    
केज तालुक्यातील तांबवा येथील भगवान मारूतीराव कराड ( वय 70 ) हे नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी शेवग्याच्या शेंगा व कांदे हे केज शहरातील मंगळवारच्या आठवडी बाजारात बिटवर विक्री करून घरी नेण्यासाठी भाजीपाला खरेदी करीत होते. याचवेळी बंडू उर्फ माणिक सिरसट ( रा. आरणगांव ता. केज ) या भामट्याने नमस्कार करून कुठले आहेत अशी विचारणा केली. त्याने शिवराणा हॉटेलमध्ये चहा घेण्यासाठी नेले. चहा घेतल्यानंतर त्याने गुंड वस्तीवर मुलीला मुलगा पाहण्यासाठी जायचे आहे. मात्र त्यांनी तेथे काही ओळखीचे नाहीत. असे सांगून जाण्यास नकार दिला. त्याने मामा तुम्ही वयस्कर आहात, माझ्या सोबत चला असे म्हणाल्याने ते दोघे पायी चालत असताना ऊन जास्त आहे. थोडे आपण झाडाखाली थांबू असे म्हणून त्याने जुन्या साळेगांवकडे जाणार्‍या रस्त्याच्या बाजूला बोरीच्या झाडाखाली नेले. तेथे त्याने बिस्कीट खाण्यास दिले, खिशातून थमसबची बाटली काढुन पिण्यास दिली. थमसब पिल्यानंतर भगवान कराड यांना गुंगी आली. हीच संधी साधून बंडू उर्फ माणिक सिरसट याने त्यांच्या हातातील सात ग्रॅमची सोन्याची अंगठी व खिशातील दहा हजार रूपये असा 31 हजाराचा ऐवज घेऊन तेथून पोबारा केला. ते शुद्धीवर आल्यावर हा प्रकार उघडकीस आला. भगवान कराड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बंडू उर्फ माणिक सिरसट याच्याविरुध्द केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. फौजदार श्रीराम काळे हे पुढील तपास करीत आहेत.

Advertisement

Advertisement