Advertisement

परळीत मकर संक्रांत उत्साहात

प्रजापत्र | Thursday, 14/01/2021
बातमी शेअर करा

परळीत मकर संक्रांत उत्साहात                                
प्रभू वैद्यनाथ व संत जगमित्र मंदिरात महिलांची गर्दी 
परळी दि.१४ (वार्ताहर)-मकर संक्रांतीचा सण गुरुवारी (दि.१४) शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. पुरुषांनी एकमेकांना तिळगूळ देत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या तर महिलांनी एकमेकींना हळदी-कुंकू लावून शुभेच्छा दिल्या. शहरातील विविध भागातील मंदिरात दर्शनासाठी रांगा होत्या. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पाचव्या क्रमांकाचे प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग परळी शहरात आहे. पहाटेपासून प्रभू वैद्यनाथ आणि संत जगमित्र नागा मंदिरात महिलांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे.
          नवीन वर्षातील पहिला सण असलेला मकर संक्रांत शहरात उत्साहात साजरा करण्यात आला. प्रभू वैद्यनाथ व संत जगमित्र नागा मंदिरात दर्शनासाठी महिलांच्या रांगा होत्या. महिला वर्ग एकमेकींना हळदी-कुंकू लावून वाणाची देवाण-घेवाण करत शुभेच्छा देत होत्या. बाजारातही तिळगुळाबरोबर वाणाचे साहित्याची विक्री जोरदार झाली. बोर-तिळाचे लाडू, सुगडे पूजन एकमेकींना वाण देऊन मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात आला. तसेच मकर संक्रांतीसाठी लागणाऱ्या वाण, वस्तुंचे स्टॉल्स मुख्यबाजारपेठेसह रस्त्या रस्त्यांवर लावण्यात आले आहेत. हळदी-कुंकुसह विविध वाण खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी दिसून येत होती.

दरवर्षीपेक्षा गर्दी कमी !
प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर व संत जगमित्र नागा मंदिरात दरवर्षी मकर संक्रांतीच्या सणाला प्रचंड गर्दी असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मात्र नागरिकांत थोड्याशा प्रमाणात भीतीचे वातावरण आहे. शहरातील महिला दर्शनासाठी येत आहेत, मात्र दरवर्षीच्या तुलनेत यंदा ग्रामीण भागांतील महिलांचे प्रमाण कमी झाल्याचे चित्र आहे.

Advertisement

Advertisement