Advertisement

आ.सोळंकेंना अजूनही मंत्रिपदाची अपेक्षा !

प्रजापत्र | Saturday, 21/11/2026
बातमी शेअर करा

  बीड दि.२० (प्रतिनिधी):बीड जिल्ह्याच्या राजकारणात दीर्घकाळापासून असलेले आणि माजलगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याचा विक्रम नोंदविलेले आ. प्रकाश सोळंके यांची मंत्रिपदाची इच्छा लपून राहिलेली नाही. त्यातच त्यांनी मागच्या आठवड्यात २०२९ साठी आपल्या पुतण्याच्या उमेदवारीची घोषणा केल्याने नागरिकांच्या भव्य उंचावल्या होत्या. मात्र आपण ही घोषणा २०२९ साठी केली आहे, आणखी ३ वर्ष आहेत, त्याकाळात मंत्रिपद मिळाले तर हवेच आहे असे म्हणत आ. प्रकाश सोळंके यांनी आपण अजूनही  मंत्रिपदाच्या स्पर्धेत असल्याचे स्पष्ट केले आहे.

   राज्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्रीपद उपभोगलेल्या दिवंगत सुंदरराव सोळंके यांचे सुपुत्र असलेल्या आ. प्रकाश सोळंके यांना मजळगावच्या राजकारणात दीर्घकाळ आमदारकी उपभोगता आली. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या माध्यमातून राजकीय पुनर्वसन झालेले आ. प्रकाश सोळंके भाजप , राष्ट्रवादी असा प्रवास करत राष्ट्रवादीत स्थिरावले आणि फुटीनंतर अजित पवारांच्या गटासोबत गेले. मधल्या काळात त्यांना काही काळासाठी संपुआच्या सरकारमध्ये राज्यमंत्री पदाची संधी मिळाली (त्याच काळात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे 'राज्यमंत्री म्हणजे शेळीचे शेपूट हे विधान फार गाजले होते ), मात्र त्यांची कॅबिनेट मंत्रिपदाची इच्छा हे अजूनही स्वप्नच राहिलेले आहे.

आ. प्रकाश सोळंके यांनी आपल्याला मंत्रिपद मिळावे यासाठी पक्षावर अनेकदा दबाव आणला, पक्षातील आणि राजकारणातील स्वतःचे ज्येष्ठत्व वारंवार मांडण्यासोबतच अगदी बीड जिल्ह्यात ओबीसींनाच मंत्रिपद आणि पालकमंत्रिपद मिळते इथपर्यंतची विधाने केली. राष्ट्रवादीमधील नेते धनंजय मुंडे यांच्या राजकीय अडचणी वाढल्यानंतर या अडचणी म्हणजे स्वतःच्या मंत्रिपदासाठी संधी समजून त्यांनी आक्रमक भूमिकाही घेतली, मात्र अजूनही राष्ट्रवादीकडून त्यांचे मंत्री पदाचे स्वप्न पूर्ण झालेले नाही.

त्यातच मागच्या आठवड्यात त्यांनी २०२९ च्या निवडणुकीसाठी पुतणे जयसिंग सोळंके यांच्या नावाची घोषणा केली होती, त्यामुळे ती त्यांची राजकीय निवृत्ती मानली जात होती. मात्र आपली ती घोषणा २०२९ साठी आहे, म्हणजे आणखी तीन वर्ष आपल्याकडे आहेत, त्याकाळात मंत्रिपद मिळाले तर ते आपल्याला हवेच आहे. आपण वयाच्या ७५ व्या वर्षी म्हणजे २०२९ मध्ये निवृत्त होणार आहोत असे म्हणत आ. प्रकाश सोळंके यांनी 'आपण अजूनही मंत्रिपदाच्या शर्यतित असल्याचेच' स्पष्ट केले आहे. 

Advertisement

Advertisement