बीड दि.१३ (प्रतिनिधी): जिल्ह्यातील धारूर तालुक्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून आलेल्या ११ ऊसतोड मजुरांना मजुरी न देता, त्यांना डांबून ठेवून त्यांचा छळ करण्यात आला. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या आदेशाने महसूल आणि पोलीस प्रशासनाने बुधवारी सायंकाळी कारवाई करत या मजुरांची 'वेठबिगारी'तून मुक्तता केली आहे.
धारूर तालुक्यातील आमला येथील ओम चंद्रकांत सोळंके याने नोव्हेंबर २०२५ मध्ये उत्तर प्रदेशातील ललितपूर आणि मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील ११ मजुरांना ऊसतोडणीसाठी आणले होते. मात्र, कामाचा मोबदला मागितला असता सोळंकेने त्यांना अमानुष मारहाण केली. त्यांना घराबाहेर पडू न देता, जिवे मारण्याची धमकी देऊन सतत राबवून घेतले. मजुरांच्या ठेकेदाराने पैसे मागितले असता त्यालाही बदडून काढण्यात आले.हताश झालेल्या मजुरांच्या कुटुंबीयांनी उत्तर प्रदेशातील ललितपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. ललितपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्य ओळखून बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना फोनवरून माहिती दिली आणि विशेष पत्र पाठवले. जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी तात्काळ माजलगावचे उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले आणि नायब तहसीलदार सुरेश पाळवदे यांना कारवाईचे आदेश दिले. बुधवारी सायंकाळी हिंगणी शिवारात धाड टाकून या सर्व अकरा जणांची सुटका करण्यात आली.या प्रकरणी मजुरांपैकी हरिसिंग सहरिया याच्या फिर्यादीवरून दिंद्रुड पोलीस ठाण्यात ओम चंद्रकांत सोळंके विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांसह 'वेठबिगारी पद्धत (उच्चाटन) अधिनियम १९७६' नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

