Advertisement

एमपीएससीने २१ डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली

प्रजापत्र | Monday, 08/12/2025
बातमी शेअर करा

मुंबई: राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४८ नगरपंचायती निवडणुकीच्या (Election) मतमोजणीमुळे २१ डिसेंबर रोजीची एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) सर्वच जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, नव्याने परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून ४ जानेवारी आणि ११ जानेवारी २०२६ रोजी परीक्षा होणार आहे. महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ (Exam) अनुक्रमे ४ जानेवारी आणि ११ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे, अशी माहिती आयोगाने दिली. त्यामुळे, परीक्षार्थी, उमेदवारांनी याची दखल घ्यायला हवी.

      महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ च्या परीक्षेचे आयोजन २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत करण्यात आले होते. तथापि, राज्यातील नगर परिषद व नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूका कार्यक्रमांतर्गत राज्य निवडणूक आयोगाच्या २ डिसेंबर २०२५ रोजीच्या आदेशानुसार मतमोजणी २१ डिसेंबर रोजी करण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांना निर्देशित केले आहे. आयोगामार्फत आयोजित परीक्षा व मतमोजणी एकाच दिवशी असल्याने त्यासंदर्भात काही मुद्यांच्या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांकडून माहिती मागविण्यात आली होती. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून आलेली माहिती आणि निकालाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उपरोक्तप्रमाणे जिल्हाधिकारी यांचेकडून मागविलेल्या माहितीच्या अनुषंगाने, काही जिल्हा केंद्रावरील परीक्षा उपकेंद्र व मतमोजणीचे ठिकाण यामधील कमी अंतर, लाऊडस्पीकरचा आवाज, वाहतूक कोंडी, परीक्षेदरम्यान निघणाऱ्या विजयी उमेदवारांच्या मिरवणुका, तसेच परीक्षेच्या आयोजनाकरीता कर्मचाऱ्यांची कमतरता इत्यादी बाबी विचारात घेवून त्यांनी परीक्षा आयोजित करण्यास अडचणी उद्भवू शकतात असे कळविले आहे. सदर वस्तुस्थिती विचारात घेता प्रस्तुत परीक्षा नियोजित तारखेस न घेता पढे ढकलण्याचा आयोगाने निर्णय घेतल्याचे आयोगाने परिपत्रकाद्वारे कळवले आहे.
 

Advertisement

Advertisement