Advertisement

अल्पवयीन मुलीस फुस लावून पळविलेल्या आरोपीस परभणीतुन अटक

प्रजापत्र | Tuesday, 28/03/2023
बातमी शेअर करा

परळी वैजनाथ - परळी तालुक्यातील कन्हेरवाडी या ठिकाणच्या एका अल्पवयीन मुलीस जालनाच्या तिघा आरोपींनी फुस लावून पळवुन‌ नेल्याची खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन पोलिसांनी परभणी रेल्वे स्थानकावरून मुलीसह आरोपीस ताब्यात घेतले आहे.

 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, परळी तालुक्यातील कन्हेरवाडी या ठिकाणी रमा रवी बनसोडे हे आपल्या कुटुंबासह राहतात त्यांना दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. रमा बनसोडे ह्या काल सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास शेतात काम करून घरी परतले असता त्यांना आपली बारा वर्षीय मुलगी दिसून आली नाही त्यावेळी त्यांनी याबाबत आपल्या मुलास विचारले मात्र त्याला देखील ती कुठे गेली याचा पत्ता नव्हता. रमा बनसोडे यांना संशय आल्याने त्यांनी ताबडतोब परळीचे ग्रामीण पोलीस स्टेशन गाठले आणि घटना  पोलीस निरीक्षक सुरेश चाटे यांना सांगितली. सुरेश साठे यांनी परळी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करून अपहरण झालेल्या मुलीच्या शोधार्थ पोलीस उपनिरीक्षक गणेश झांबरे, एक पोलीस कर्मचारी आणि महिला पोलीस कर्मचारी सविता ढोले यांना या कामगिरीवर पाठवले. ह्या पथकाने मोबाईल ट्रेस करून मुलीसह आरोपी परभणीच्या रेल्वे स्थानकावर असल्याचे समजताच त्यांनी धावतच रेल्वे स्टेशन गाठले आणि अल्पवयीन मुलीस ताब्यात घेऊन आरोपी सुशीला ग्यानदेव कांबळे (वय-४०), ग्यानदेव विठ्ठलराव कांबळे (वय-४३), व यांचा मुलगा अविनाश ग्यानदेव कांबळे (वय-२०) सर्व राहणार सुवर्णकार नगर हनुमान मंदिराजवळ तालुका जिल्हा जालना या आरोपींच्या मुसक्या आवळून जेरबंद केले.

 

परळी ग्रामीण पोलिसांनी ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, सहाय्यक पोलीस अधीक्षक कविता नेरकर, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश चाटे, पोलीस उपनिरीक्षक गणेश झांबरे व महिला पोलीस कर्मचारी सविता ढोले यांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश झांबरे हे करीत आहेत. परळी ग्रामीण पोलिसांनी वेळीच कारवाई करून आरोपींच्या मुलीसह मुसक्या आवळीत जेरबंद केल्यामुळे पुढील अनर्थ टळला यामुळे सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Advertisement

Advertisement