Advertisement

दिल्ली : गुरुवारी दुपारी हाथरस येथील बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी राहुल आणि प्रियंका गांधी ताफा घेऊन निघाले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना अर्ध्या रस्त्यात थांबवलं. यावेळी चालत निघालेल्या राहुल गांधी यांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर आता राहुल गांधी पुन्हा एकदा हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्याच्या तयारीत आहेत.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत हथरस येथे जाणार असल्याची माहिती दिली आहे. “जगातील कोणतीही ताकद मला हाथरस येथील दुखी कुटुंबाला भेटण्यापासून रोखू शकत नाही,” असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. “पीडित मुलीबरोबर आणि कुटुंबासोबत उत्तर प्रदेश सरकार आणि पोलिसांनी केलेला व्यवहार मला तर मान्य नाहीच शिवाय कोणत्याही भारतीयांना हा व्यवहार पटला नसेल,” असंही राहुल गांधी म्हणाले आहेत. 

Advertisement

Advertisement