Advertisement

मुलींच्या मृत्यूप्रकरणात गुन्हा नोंदविण्यासाठी मुंडन आंदोलन

प्रजापत्र | Saturday, 18/09/2021
बातमी शेअर करा

बीड-तालुक्यातील राक्षसभुवन येथे दोन मुलींचा गोदावरी नदीच्या डोहात बुडून मृत्यु झाला. या प्रकरणी महसूल विभाग सर्वस्वी जबाबदार असून दोषींविरोधात अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही. कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज (दि.१८) मुंडन करून आंदोलन करण्यात आले. या आगळ्यावेगळ्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या वेळी अनेक कार्यकर्त्यांनी मुंडन केले.
                  २८ ऑगस्ट रोजी राक्षसभुवन शनिचे येथील नेहा धर्मराज कोरडे (वय ९) व अमृता धर्मराज कोरडे (वय-७) या दोन मुलींचा गोदावरीच्या नदी पात्रातील डोहात बुडून मृत्यू झाला होता. वाळु तस्करांनी खांदलेल्या खड्ड्यांमुळे दोन्ही मुलींचा बळी गेला आहे. या प्रकरणी प्रशासनाने अद्याप कुठलीही ठोस भूमिका घेतलेली नाही. मुलींच्या मृत्यू प्रकरणी राक्षसभुवन ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, मंडल अधिकारी व तहसीलदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच मादळमोही येथील पवन गावडे यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपींना अद्यापही अटक करण्यात आलेली नाही त्यास अटक करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन करून आंदोलन करण्यात आले. या वेळी परमेश्‍वर वाघमोडे यांच्यासह आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Advertisement

Advertisement