Advertisement

हे राज्य.... हे तो...इच्छा?

प्रजापत्र | Wednesday, 26/08/2020
बातमी शेअर करा

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तारूढ झाले तेव्हापासून भाजप हे सरकार फार काळ टिकणार नाही असा दावा करत आहे. मात्र आतापर्यंत सरकारमधील पक्ष हा दावा फेटाळून लावत होते . पण सध्या काँग्रेसला सोबत घेऊन सरकार चालविणे किती अवघड आहे याचा अनुभव महाविकास आघाडीला येत आहे. मुळात काँग्रेसची राज्यातील परिस्थिती कितीही  खालावली असली तरी आपण राष्ट्रीय पक्ष आहोत या भूमिकेतून काँग्रेस कधीच बाहेर पडणार नाही, त्यामुळे आपले ऐकूनच घेतले पाहिजे हीच भूमिका सर्वच काँग्रेसजनांची असते. अर्थात ज्यावेळी एकत्रित सरकार असते, त्यावेळी प्रत्येक पक्षाला अशी भूमिका घ्यावीच लागते आणि आग्रही देखील असावे लागते , मात्र याचा अर्थ आपणच आपले सरकार अस्थिर करण्याचे इशारे द्यायचे नसतात .
नगरविकास विभागाच्या निधीवरून काँग्रेस आमदार गोरंट्याल यांनी थेट उपोषणाचा इशारा द्यावा हा प्रकार सरकारमध्ये सारे काही आलबेल नाही हे दाखवणाराच होता. काँग्रेसच्या पाठिंब्यावर हे सरकार आहे हे मान्यच, पण म्हणून या सरकारचा काँग्रेसला काहीच फायदा झालेला नाही असे म्हणता येणार नाही. तसेच काँग्रेसच्या अखत्यारीत देखील अनेक खाती आहेत, त्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार त्या पक्षाला आहेत. नगरविवकास खाते सेनेकडे आहे, त्यामुळे सेना निधी देताना आपला राजकीय विचार करणारच, त्यात काही वावगे आहे असेही नाही, आजकाल कोणताही पक्ष तसेच राजकारण करतो, मात्र त्यावर चर्चा करण्याऐवजी जाहीर इशारे देणे आघाडी धर्मासाठी योग्य नसते .
आज राज्यात काँग्रेस जे काही वागत आहे त्यावरून वसंतदादांच्या सरकारची आठवण येत आहे. वसंतदादा राज्याचे मुख्यमंत्री असताना इंदिरा काँग्रेसचे नासिकराव तिरपुडे हे उपमुख्यमंत्री होते. आणि सरकारच्या प्रत्येक गोष्टीवर तिरपुडे हेच टीका करायचे. अगदी वसंतदादा चालताना काठी वापरतात यावर 'आमचे सरकार काठीवर चालत आहे' अशी टीका सुद्धा तिरपुडे करीत होते आणि या रोजच्या कटकटीपेक्षा हे सरकार नको अशा मानसिकतेत वसंतदादा आले होते. पुढे शरद पवारांनी बंड केले आणि हे सरकार पडले हा इतिहास आहे. तर आज राज्यात काँग्रेस नेत्यांची जी विधाने आहेत, त्यावरून काँग्रेसला सत्तेची गरज नाही असेच वाटत आहे. गोरंट्याल यांचा विषय अजित पवारांनी भेट देऊन सध्या तरी मिटवला आहे, मात्र सरकार स्थापन झाल्यापासून काँग्रेसचा प्रत्येक नेता जी वेगवेगळी भूमिका घेत आहे, ती पाहता उद्या 'नको हे सरकार ' असे वाटण्याची वेळ येणारच नाही याची खात्री कोणी द्यायची.? त्यावेळी जसे शरद पवार सुरुवातीपासून 'नको यांच्यासोबतचा संसार ' असे सांगायचे तसेच यावेळी अजित पवार सुरुवातीपासून 'काँग्रेसचे नखरे नको ' अशी भूमिका सातत्याने घेत आले आहेत . त्यामुळे भविष्यात काँग्रेसची कुरकुर वाढत गेली तर जसे वसंतदादांच्या वेळी आले तसे होणारच नाही याची खात्री कोणी द्यायची ? शेवटी इतिहास खूप काही शिकवून जात असतो, आणि इतिहासातूनच टिकायचे आणि टिकवायचे कसे हे देखील शिकायचे असते , महाराष्ट्रातील काँग्रेस हे शिकणार आहे का ? 

Advertisement

Advertisement