Advertisement

धनंजय मुंडेंच्या सहकार्यानेच गोपीनाथ मुंडे संस्थेचा विकास - सामंत

प्रजापत्र | Saturday, 22/08/2020
बातमी शेअर करा

बीड-डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ग्रामीण विकास संस्थेच्या कार्यकारीणीची घोषणा उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली होती. या संस्थेत मंत्री धनंजय मुंडे यांचा समावेश नसल्याबाबत चर्चा होत असतानाच धनंजय मुंडे यांच्या सहकार्यानेच गोपीनाथ मुंडे संस्थेचा विकास केला जाईल असे ट्विट उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले आहे. 
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात फडणवीस सरकारच्या काळात गोपीनाथ मुंडे ग्रामविकास संस्थेची घोषणा करण्यात आली होती. विद्यापीठाच्या माध्यमातून ग्रामीण विकासाचे अभ्यासक्रम आणि कार्यक्रम राबविण्याचा उद्देश असलेल्या या संस्थेला घोषणेनंतर फडणवीस सरकारकडून निधीच मिळाला नाही. 
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आता या संस्थेकडे सरकारने लक्ष दिले असून उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्वत:च्या अध्यक्षतेखाली संस्थेतील सदस्यांची घोषणा केली होती. यात मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र या संस्थेच्या विकासासाठी मागच्या सरकारने काहीच केले नाही आता आपण मंत्री धनंजय मुंडे यांच्या सहकार्यानेच या संस्थेचा विकास करणार आहोत. खर्‍या अर्थाने गोपीनाथ मुंडेंचे स्वप्न या संस्थेच्या माध्यमातून धनंजय मुंडेंच्या सहकार्याने पुर्ण करण्याचा प्रयत्न करु असे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. 

समितीत पंकजांना स्थान,सेनेशी जवळीकीची चर्चा
दरम्यान या समितीत दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या तथा राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा समावेश करण्यात आला आहे. मंत्री उदय सामंत अध्यक्ष असलेल्या या समितीत पंकजा मुंडे यांचा समावेश झाल्याने त्यांच्या शिवसेनेसोबतच्या जवळीकीची चर्चा जोर धरत आहे. सुरुवातीपासूनच उध्दव ठाकरे आणि मुंडे कुटुंबाचे स्नेहाचे संबंध आहेत. विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर राज्यात भाजप आणि सेनेत तणाव निर्माण झालेला असतानाही उध्दव ठाकरे गोपीनाथ गडावर नतमस्तक झाले होते.

Advertisement

Advertisement