Advertisement

गोरगरिबांंवर मंगळसूत्र गहाण ठेवून जगण्याची वेळ

प्रजापत्र | Saturday, 22/08/2020
बातमी शेअर करा

बीड : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे सांगत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी लॉकडाऊनचे समर्थन करत असले तरी गोरगरिबांना मात्र जगणे अवघड झाले आहे. मागच्या अनेक दिवसांपासून व्यापार बंद असल्यामुळे गोर गरिबांवर चक्क मंगळसूत्र गहाण ठेवून जगण्याची वेळ आली आहे. मात्र प्रशासन गोर गरिबांच्या रोजच्या जगण्याचा विचार करायला तयार नाही.
राज्यभरात कोरोनाचा लॉकडाऊन टप्प्या टप्प्याने उघडणे सुरु असले तरी बीड जिल्ह्यात मात्र व्यवहार बंद ठेवण्यावर प्रशासनाचा भर आहे. अगोदरच हॉटेल, रेस्टॉरंट आदींसारखे व्यवहार उघडण्यास राज्य सरकारनेही परवानगी दिलेली नाही त्यातच बीड जिल्ह्यातील सहा शहरात मागच्या दहा दिवसांपासून लॉकडाऊन सुरु आहे. 
मागच्या पाच महिन्यांपासून सारेच व्यवहार बंद असल्यामुळे हातावर पोट असणार्‍यांचे हाल सुरु आहेत. पहिला महिना अनेकजण मदतीला आले नंतर मात्र मदत करणारांचे देखील स्वत:चेच वांदे झाल्याचे चित्र आहे. आता व्यवसाय बंद आहेत, घरात खायला काही नाही, लॉकडाऊनच्या काळात कोणी उधारही द्यायला तयार नाही. अशा परिस्थिती चक्क मंगळसूत्र गहाण ठेवून हजार पाचशे रुपये मिळवायचे आणि त्यातून कसातरी चरितार्थ भागविण्याची वेळ गोर गरिबांवर आली आहे. बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी छोट्या सरांफांच्या घरी जाऊन त्यांच्या हातापायापडून मंगळसूत्र गहाण ठेवा पण हजार दोन हजार रुपये तरी द्या हो असे म्हणत लोक जात आहेत.  सराफ सुवर्णकारांच्या देखील वेगळ्याच अडचणी आहेत. त्यांनाही दुकाने उघडता येत नाहीत. बँका बंद आहेत. मंगळसूत्र गहाण ठेवून पैसे द्यायचे म्हटले तरी रोख रक्कम आणायची कोठून हा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे ते देखील पैसे द्यायला असमर्थता व्यक्त करत आहेत. जिल्ह्याच्या बहुतांश भागात गोर गरिबांच्या वस्त्यांमध्ये कमी अधिक फरकाने हेच चित्र आहे मात्र कोरोना संसर्ग वाढेल असे सांगताना प्रशासन गोर गरिबांच्या रोजच्या जगण्याच्या प्रश्‍नाकडे लक्ष द्यायला तयार नाही आणि लोकप्रतिनिधी या बाबत बोलायला तयार नाहीत.

Advertisement

Advertisement