Advertisement

राज्यात लोकल, सिनेमागृह पुन्हा बंद? परीक्षाही ऑनलाईन? वाचा काय म्हणाले विजय वडेट्टीवार!

प्रजापत्र | Friday, 26/02/2021
बातमी शेअर करा

मुंबई-महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागलेले असतानाच त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुन्हा एकदा काही निर्बंध लागू करावे लागण्याची चर्चा सुरू झाली आहे. या मुद्द्यावर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. या मुद्द्यांच्या आधारावरच राज्यात यापुढील काळात निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. कोरोनाची लस आली असली, तरी वाढत्या करोनाच्या फैलावाला आवर घालण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे संकेत देखील वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिले आहेत.

राज्यात आणि विशेषत: मुंबईत कोरोनाचे वाढते रुग्ण ही चिंतेची बाब ठरत असून त्यावर राज्य सरकार लवकरात लवकर निर्णय घेण्याची शक्यता आहे. यावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘कोरोनाचे वाढते रुग्ण पाहाता काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. मुंबईत लोकल पूर्णपणे बंद न करता गर्दी टाळण्यासाठी लोकलच्या फेऱ्यांचं नवीन वेळापत्रक तयार केलं जाईल. त्यासोबतच बसेसमध्ये देखील होणारी गर्दी नियंत्रणात येण्यासाठी योग्य ते निर्णय घेतले जातील.’

 

विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन?

दरम्यान, नुकताच तमिळनाडू सरकारने ९वी, १०वी आणि ११वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताच सहामाही आणि तिमाही परीक्षांच्या गुणांच्या आधारावर विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या आधारावर महाराष्ट्रात देखील अशा प्रकारच्या निर्णयावर विचार होत आहे. मात्र, त्यासोबतच परीक्षा व्हायलाच हव्यात, अशी देखील मागणी अनेकांकडून होत असून ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेता येतील का? यावर देखील विचार सुरू असल्याचं वडेट्टीवार यावेळी म्हणाले.

 

 

मंगल कार्यालयांवरही निर्बंध?

यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी मंगल कार्यालयांवर देखील बंधनं घालण्याचे संकेत दिले. गेल्या काही दिवसांपासून सामान्य जनतेपासून राजकीय नेतेमंडळी आणि सेलिब्रिटींच्या लग्नकार्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. या पार्श्वभूमीवर ‘मंगलकार्यालयांमध्ये होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आणणे, त्यावर लक्ष ठेवणे यासाठी पावलं उचलली जातील’, असं ते म्हणाले.

Advertisement

Advertisement