Advertisement

चोरी गेलेल्या मोबाईलमधून ९८ हजार रुपयांचा अपहार.

प्रजापत्र | Tuesday, 19/01/2021
बातमी शेअर करा

किल्लेधारूर दि.१९(वार्ताहर) तालुक्यातील जागीरमोहा येथील ऊसतोड मजुराचा चोरीला गेलेल्या मोबाईल  मधून फोन पे ॲप  वरुन तब्बल ९८ हजार रुपयांचा अपहार झाला असून याबाबत पोलिस अधिक्षक बीड  यांच्याकडे तक्रार देण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील जागीरमोहा येथील रमेश पांडुरंग मंदे हे कर्नाटक राज्यात लैला शुगर, खानापुर या कारखान्यावर ऊसतोड मजुरी करतात. दि.२ जानेवारी रोजी ओप्पो कंपनीचा १६ हजार रुपये किंमत असलेला त्यांचा मोबाईल बिडी (कर्नाटक) येथे बाजारात दुपारी ३ च्या सुमारास चोरीला गेला. जागीरमोहा येथे मतदान असल्याने ते शुक्रवारी गावाकडे आले. दि.१५ रोजी त्यांनी आपल्या स्टेट बँक अॉफ इंडिया  शाखा माजलगाव रोड धारुर येथील खात्यावर त्यांनी ४५ हजार रुपये जमा केले. दरम्यान नवीन मोबाईल व सिम चालू केले असल्यामुळे त्यांना त्यांच्या मोबाईलवर रक्कम काढल्याचे संदेश प्राप्त झाले. यानंतर त्यांनी एटिएममध्ये शिल्लक रक्कम तपासली असता त्यांच्या रकमेचा अपहार झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत बँकेत सुचना देवून बीड येथील पोलिस  अधिक्षक कार्यालयात चोरीला गेलेल्या मोबाईल मधून फोन पे ॲपच्या माध्यमातून अज्ञात व्यक्तीने ९८ हजार रुपयांचा अपहार केल्याचा तक्रार अर्ज देण्यात आला.

Advertisement

Advertisement