Advertisement

संपादकीय अग्रलेख -भाजपचा खरा चेहरा

प्रजापत्र | Friday, 03/05/2024
बातमी शेअर करा

एकीकडे घराणेशाहीवर टीका करायची आणि दुसरीकडे बापाबद्दल आक्षेप किंवा गंभीर आरोप आहेत म्हणून लेकाला उमेदवारी द्यायची असा दुटप्पीपणा भाजपने केला आहे. अर्थात भाजपच्या दुट्टप्पीपणाचे हे काही पहिलेवहिले उदाहरण नाही, तर भाजप सातत्याने असेच दुटप्पी वागत आला आहे. आम्ही भ्रष्टाचार संपवायला निघालो आहोत असे सांगत भाजपने खुद्द सोमय्यांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते , त्यांना स्वतः किंवा मित्र पक्षांनी दिलेली उमेदवारी भाजपचा खरा चेहरा दुटप्पी आहे हेच सांगणारी आहे.
 

 

भारतीय कुस्ती परिषदेचा माजी अध्यक्ष खा. ब्रिजभूषण याला धक्का लावणे भाजपला सहज नाही हे तर सर्वांनाच माहित होते. अगदी ५६ इंचांची छाती असली तरी भाजप वेळ आल्यावर कसे नमते घेतो हे देशाने अनुभवले आहेच. खा. ब्रिजभूषण याच्यावर लावलेले आरोप गंभीर असले, त्यासाठी भारताचा सन्मान असलेल्या खेळाडूंनी आंदोलन केले असले तरी त्या साऱ्या पेक्षाही ब्रिजभूषणचे राजकीय वजन भाजपसाठी महत्वाचे ठरले. नाही म्हणायला स्वतः ब्रिजभूषणची उमेदवारी भाजपने कापली आणि त्याच्या जागेवर त्यांचे पुत्र करणसिंह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खा. ब्रिजभूषण यांची उमेदवारी कापल्यानंतर त्या ठिकाणी कोणत्याही 'सामान्य ' कार्यकर्त्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची आणि मोदींच्या 'करिष्म्यावर ' निवडणून आणण्याची धमक भाजपला दाखविता आली नाही. विशेष म्हणजे जे भाजपवाले किंवा मोदी आणि अमित शहा इतरवेळी उठसूट काँग्रेसवर  'परिवारवाद'  चा आरोप करीत असतात, त्याच भाजपला ब्रिजभूषणच्या ऐवजी करणसिंह ला उमेदवारी देताना यात कोठेही 'परिवारवाद ' दिसला नाही. अर्थात नेत्यांच्या घरातच उमेदवारी देण्याचे भाजपचे हे काही पहिलेच उदाहरण आहे असे नाही, पण किमान ज्यांच्यावर महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाचे आरोप आहेत अशा व्यक्तीच्या घरात उमेदवारी देताना तरी भाजपने विचार करायला हवा होता. पण ब्रिजभूषणसिंह या व्यक्तीची जरबच इतकी मोठी आहे की भाजपला त्याच्या मागे फ़रफ़टावे लागले. अर्थात जसे उत्तरप्रदेशात तसेच कर्नाटकात. भाजप एकीकडे आम्ही महिलांच्या हक्काची लढाई लढत आहोत असे सांगत आहे आणि त्याचवेळी सेक्सस्कॅन्डलचा आरोप असलेला भाजपच्या मित्रपक्षातील नेत्यांचा नातेवाईक प्रज्वल रेवण्णा या देशातून 'फुर्रर ' झालेला असतो . विशेष म्हणजे इतरवेळी आपण फार कठोर आहोत असा दावा करणाऱ्या भाजपला आणि केंद्र सरकारला याची जराही शरम वाटत नाही, इतका कोडगेपणा भाजपच्या अंगांगात भिनला आहे.

 

प्रत्येक मुद्द्यावर या पक्षाची भूमिका दुटप्पी आणि तितकीच कोडगी राहिलेली आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात भाजपची अवस्था वॉशिंगमशीन सारखी झाली आहे हे काही लपून राहिलेले नाही. मात्र भाजपचेच नेते असलेल्या किरीट सोमय्यांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते असे थोडे थोडके नव्हे तर पाच व्यक्ती आता महायुतीचे उमेदवार आहेत. एक तर स्वतः भाजपचे उमेदवार आहेत. अगदी मित्र पक्षांच्या सुनेत्रा पवार यांचीही उमेदवारी भाजपला पचली (सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांच्यावरही सोमय्यांनी आरोप केले होतेच ) , म्हणजे भाजपला भ्रष्टाचाराची खरोखर काही चाड आहे असे म्हणण्यासारखी देखील परिस्थिती नाही. आणि इतके करून पुन्हा भाजपचे नेते आम्ही भ्रष्टाचार रोखण्यासाठी मते मागत आहोत असे सांगण्याचा कोडगेपणा करीत आहेतच. म्हणजे दुटप्पीपणा किती असावा याच्या साऱ्या मर्यादा भाजपने केव्हाच ओलांडल्या आहेत. या पक्षाला कोणत्याच गोष्टीचे वावडे राहिलेले नाही आणि सत्तेसाठी कोणताही धरबंध देखील राहिलेला नाही हेच एकमेव सत्य आहे. 

Advertisement

Advertisement